वर्धा 29 मे : जिवघेण्या स्पर्धेच्या युगात मार्क्स मिळविताना मुलांवर प्रचंड ताण येतो. टक्केवारीच्या मागं धावताना मुलं, मुली बरेचदा जिवाचाही विचार करत नाहीत. अपेक्षांपेक्षा कमी गुण मिळाल्यास टोकाची पावलं विद्यार्थी उचलतात. असाच प्रकार वर्ध्यातील अडेगाव इथं घडला. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानं एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली.
पूजा विजय भिसे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात पूजा बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. बारावीचा निकाल असल्यानं तिलाही उत्सूकता होती. तिनं ऑनलाईन निकाल बघितला. बारावीत पूजाला 55 टक्के गुण मिळालेत. कोणतीही शिकवणी न लावता पूजानं हे यश मिळवलं होतं. तिच्या कुटुंबातून तिला कमी मार्क्स पडले म्हणून कुणीही रागावलं नाही. मात्र तिलाच त्याचं वाईट वाटलं.
उलट मुलीचं कौतूक करण्यासाठी तिचे वडिल विजय भिसे यांनी घरी पेढेही आणले होते. पण सायंकाळच्या सुमारास पूजानं घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सगळं कुटुंब दु:खात बुडून गेलं. पूजाच्या आत्महत्येनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. केवळ कमी गुण मिळाल्यानं आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलणं हे सर्वांच्या मनाला चटका लावणारं आणि काळजी वाढवणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केलीय.
बारावीत कमी मार्क मिळाले तर...
तुम्ही विज्ञान, गणित या विषयांत हुशार असलात तरच हुशार आणि एखाद्या कलेत प्रवीण असाल तर मात्र हुशार नाही, हा समजच चुकीचा आहे, असं तज्ज्ञांतं मत आहे. पुस्तकी बुद्धिमत्ता म्हणजेच फक्त हुशारी, असं नव्हे. दहावी - बारावीला मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड कौतुक होतं. पण हेच विद्यार्थी पुढच्या 20- 25 वर्षांनी कुठे आहेत हे तुम्हाला माहीत असतं का? याउलट जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारून बघा. तुम्हाला दहावी, बारावीमध्ये किती मार्क मिळाले होते... काय असेल त्यांचं उत्तर? त्यांच्या या उत्तरातून तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याचे धडे मिळतील असंही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे.