तोल गेल्याने ऑटो रिक्षातून पडून धुळ्यात शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

तोल गेल्याने ऑटो रिक्षातून पडून धुळ्यात शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

प्रशासकीय अनास्थेने धुळे जिल्ह्यात गुरूवारी एका शाळकरी मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 4 जुलै- प्रशासकीय अनास्थेने धुळे जिल्ह्यात गुरूवारी एका शाळकरी मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. शाळेतून घरी परतणार्‍या पाचवीतील विद्यार्थ्याचा ऑटो रिक्षातून खाली पडल्‍याने जागीच मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे दुपारी ही घटना घडली. दर्शन मनोज कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप दर्शनच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, नातेवाईकांनी दर्शनचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून आपला रोष व्यक्त केला.

मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे राहणारे विद्यार्थी शिंदखेडा तसेच धमाणे गावात शाळेत जातात. यासाठी रिक्षाचा वापर केला जातो. याच रिक्षामध्‍ये अनेक प्रवासी देखील असतात. आज नेहमीप्रमाणे साहुर येथील दर्शन मनोज कोळी हा पाचवीतील विद्यार्थी शाळेत गेला. शाळेतून रिक्षामधून (एमएच-18- जीजे- 4610) दर्शन हा घराकडे परत येत होता. ही रिक्षा गावाजवळ आली असता एका खड्‍ड्‍यात चाक गेल्याने दर्शन रिक्षाच्या बाहेर फेकला जावून मागील चाकात आला. गंभीर जखमी झाल्याने त्‍याचा मृत्‍यू झाला.

साहूर गावाला एसटी बस सुविधा नाही..

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावाला एसटी बस सुविधा नाही. एसटी बस सुविधा सुरू व्हावी, यासाठी दर्शनच्या पालकांसह साहूरचे गावकरी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहे. अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावाही केला. परंतु साहूर गावात एसटी बस सुरू झाली नाही. गावात एसटी बस येत नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने शाळेत ये-जा करावी लागते. दरम्यान, दर्शन नेहमीप्रमाणे खासगी वाहनातून शाळा सुटल्यानंतर घरी जात होता. रिक्षा खड्ड्यात गेल्याने तोल जाऊन दर्शन खाली पडला. रिक्षाच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा दुर्दवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत दर्शनचा मृतदेह हा थेट धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. दोषींवर कारवाईची मागणी दर्शनच्या नातेवाईकांनी केली आहे. दोषींवरती कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत दर्शनचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. मयत दर्शनच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

प्रशासनाची टोलवाटोलवी...

तब्बल दोन तास दर्शनचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर पडून असताना प्रशासन मात्र टोलवाटोलवी करीत आहे. शेवटी संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश लक्षात घेता यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी शिक्षणविभाग, एसटी महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेत साहूर गावाला एसटी बस सुविधा सुरु करण्याचे तसेच रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर दर्शनचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयातून शवविच्छेदनसाठी नेण्यात आला आहे. शाळेत जाण्यासाठी एसटी बस हवीय यासाठी पाचवीत शिकणाऱ्या दर्शनाला आपला जीव गमवावा लागल्याने या प्रशासकीय अनास्थेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री

First published: July 4, 2019, 8:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading