सचिन जिरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद, 17 जुलै- न विचारता बिस्किट खाल्ल्याने एका निवासी शाळेच्या संस्थाचालकाने चौथीच्या विद्यार्थ्याला वायरने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पालक भेटीदरम्यान सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था व संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. रामेश्वर महाराज पवार असं संस्थाचालकाचे नाव असून निरंजन सतीश जाधव असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. निरंजनला जमखी अवस्थेत त्याच्या आईने घरी आणले आहे. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस स्टेशनमध्ये संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे हे प्रकरण?
मुलांना मानवतेचा संदेश देण्यासाठी वारकारी संप्रदायाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने निल्लोड येथे माऊली वारकरी शिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. रामेश्वर महाराज पवार हे संस्थाचालका असून त्यांनी निरंजनला क्षुल्लक करणावरून बेदन मारहाण केली आहे. गुरुवारी (11 जुलै) हा प्रकार घडला. संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत निरंजनचे डोके फुटले असून हातापायांवर अक्षरश: वळे उमटली आहे. असे असतान निरंजनवर साधा औषधोपचार देखील करण्यात आली नाही. रविवारी (14 जुलै) निरंजनीची आई त्याला पालकभेटीच्या निमित्ताने संस्थेत गेली असता हा प्रकार समोर आला. निरंजनला जखमा अवस्थेत पहाताच त्याच्या आईला रडू कोसळले. तिने त्याला थेट मयुर पार्क (औरंगाबाद) येथील घरी आणले. घटना घडून पाच दिवस झाले तरी निरंजन अद्याप त्यातून बाहेर निघालेला नाही. कोणाला काही सांगितले तर पाहा, असा दम संस्थाचालकाने दिला होता. आई भेटण्यासाठी गेली त्यावेळी त्याने प्रथम मी खेळता खेळता पडलो, असे सांगितले. मात्र, सोबतच्या इतर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. निरंजनच्या पाठीवरचे वळ दाखवले.
निरंजनने काय सांगितले?
निरंजन म्हणाला, 'आम्ही सगळे मुले सोबतच राहतो. सगळ्या मुलांकडे काहीना काही खायला होते. मात्र, माझ्याकडे काहीच नव्हते. मला खूप भूक लागली होती. म्हणून मी मित्राचा पाच रुपयांचा बिस्किटचा पुडा न विचारता घेतला व दोन बिस्किटं खाल्ली. मित्राने याबाबत महाराजांकडे तक्रार केली. महाराज रागाच्या भरात माझ्याकडे आले मला बाहेर ओढले. सगळ्यांसमोर स्पिकरला लावलेली वायर काढली आणि चार पदरी वायरने मला बेदम मार दिला. त्यानंतर मी रडत रडत खेालीत गेलो. हात खूप दुखत होता म्हणून पाण्यात बुडवून ठेवला. डोक्याला रुमाल बांधला. मात्र, माझ्याकडे कोणीच आले नाही. मी आजोबांना फोन लावून द्या, असे सांगितले. पण कोणीच ऐकले नाही. माझ्यासोबत माझ्या एका मित्राला देखील महाराजांनी मारले.'
आई धुणीभांडी करुन मुलाला शिकवते...
निरंजन हा त्याच्या आजोबांकडे राहतो. त्याची आई चार ठिकाणी धुणीभांडी करुन निरंजनला शिकवते. वर्षाकाठी ती शाळेची 20 हजार रुपये फी भरते. शहरात आपल्या मुलाला वाईट संस्कार पडू नयेत, म्हणून तिने वारकरी संप्रदायाच्या शाळेत ठेवले आहे.
ही कुठली शिक्षा...?
स्वत:ला वारकरी सांगणाऱ्या या महाराजांनी मुलाला डोके फुटेपर्यंत मारले, ही मानवता नाही. याबाबत आम्हाला काही सांगितले देखील नाही. लेकरला कोणी साधी मलमपट्टीही केली नाही. नशीब आम्ही पंढरपूरच्या वारीहून आलो आणि रविवारी त्याच्या शाळेत गेलो तेव्हा प्रकार समोर आला. मुलाकडून चुकी झाली असेल तर त्याला मारा मात्र डोके फुटेपर्यंत हातपाय हिरवेनिळेपर्यंत ही कुठली शिक्षा, असा सवाल निरंजनचा आई चैताली जाधव यांनी केला आहे.
या प्रकरणी चैताली जाधव यांनी केलेल्या तक्रारीवरून वदोड बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संस्थचालक रामेश्वर महाराज पवार यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे.
कंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा