Home /News /maharashtra /

अनेकांनी काढलं वेड्यात, आज तोच वेडेपणा वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण; कथा प्राणवायूच्या उद्योगाची

अनेकांनी काढलं वेड्यात, आज तोच वेडेपणा वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण; कथा प्राणवायूच्या उद्योगाची

या उद्योगासाठी बजरंग पुरी यांनी साडे पाच कोटींची गुंतवणूक केली. त्यापैकी 3 कोटी रुपये बँकेकडून कर्ज काढलं. पण एवढी मोठी उडी घेऊन पुरी यांनी सुरू केलेला हा व्यवसाय गमतीचा विषय बनला होता

    अहमदनगर, 20 एप्रिल : आपल्या राज्यातच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी आहे. त्यामुळं ऑक्सिजन निर्मातेही या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी देवदूत ठरत आहेत. अहमदनगरच्या एका खेड्यातही अशाच एका देवदुतानं 2 वर्षांपूर्वी हे काम सुरू केलं होतं. त्यावेळी गमतीचा विषय बनलेला हा ऑक्सिजन प्लांट आज हजारो रुग्णांना जीवनदान देत आहे. (वाचा-BREAKING! आता 18+ व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE! PM मोदींचा मोठा निर्णय) तर ही कहाणी आहे, बजरंग पुरी यांच्या ध्येयवेडेपणाची. पुरी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील नांदूरघाट या लहानशा गावचे. शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात काम केलं. निवृत्तीनंतर म्हणजे 2019 मध्ये त्यांनी अहमदनगरच्या चिखलेनवाडी या लहानशा खेड्यामध्ये ऑक्सिजन निर्मितीचा उद्योग सुरू केला. या उद्योगासाठी बजरंग पुरी यांनी साडे पाच कोटींची गुंतवणूक केली. त्यापैकी 3 कोटी रुपये बँकेचं कर्ज काढलं. पण एवढी मोठी उडी घेऊन पुरी यांनी सुरू केलेला हा व्यवसाय गमतीचा विषय बनला. अगदी लहानशा खेडेगावात त्यांनी हा उद्योग सुरू केल्यानं अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. अहमदनगरमधला हा ऑक्सिजन निर्मिती करणारा एकमेव प्लांट आहे. (वाचा-दुसऱ्यांदा आढळला विनामास्क, पोलिसांनी ठोठावला थेट 10 हजारांचा दंड) लोकांना पटत नसलं तरी पुरी यांचा विचार अगदी स्पष्ट होता. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे फक्त वीज. वीजेशिवाय ऑक्सिजन तयार करण्यासाठी दुसरं काहीही लागत नाही. त्यामुळं त्यांनी उद्योग सुरू केला आणि सुरुवातीला फक्त रात्री उत्पादन करत रात्री फक्त 100 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली. औद्योगिक क्षेत्राला ते हा ऑक्सिजन पुरवठा करत होते. पण 2020 च्या सुरुवातीला कोरोनाचं संकट उभं राहिलं आणि ऑक्सिजनची मागणी वाढली. त्यामुळं त्यांनी दिवसरात्र उत्पादन सुरू केलं. सध्या तर रोज 500 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती याठिकाणी होत आहे. अहमदनगरबरोबरच आज त्यांच्या या उद्योगामुळं औरंगाबाद, बीड, जालना याठिकाणीही ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यास मदत होत आहे. पुरी यांच्यावर सुरुवातीला अनेकजण हसले. त्यांचा उद्योग गमतीचा विषय बनला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळंच आज हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं पुण्य त्यांना मिळतंय. बजरंग पुरी यांनादेखिल तेच जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण कदाचित जर त्यांनी दोन वर्षांपूर्वी जिद्दीनं हा उद्योग सुरू केला नसता तर, कोरोनाच्या या राक्षसाच्या विळख्यात अडकलेल्या हजारो रुग्णांच्या शरिरात प्राण फुंकण्यासाठी कदाचित प्राणवायूच मिळवणंच कठीण गेलं असतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar News, Oxygen supply

    पुढील बातम्या