विशाल रेवडेकर, प्रतिनिधीसिंधुदुर्ग, 8 जानेवारी : सिंधुदुर्गात एसटी बसवर दगडफेक (Stone pelting on ST bus in Sindhudurg) झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून 30 विद्यार्थी (30 students travelling in ST bus) प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर दगडफेक झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी ही दगडफेक केली आहे. या दगडफेकीच्या घटनेत चालक कुमार तांबट यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंधुदुर्गातील कणकवली येथून कळसुलीकडे निघालेल्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली आहे. या एसटी बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत होते. या दगडफेकीच्या घटनेत कुठल्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये. मात्र बस चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली. मात्र, एसटी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरण कऱण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक कर्मचारी संपावरच आहेतय तर काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असतानाच अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत.
संपामुळे 550 कोटींचं नुकसान
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आतापर्यंत एसटीचे 550 कोटींचे नुकसान झाले आहे. 10 हजार कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन झालं आहे. सरसकट कामगारांची चुकी नाही. भडकवणारे उद्या निघून जातील, पण कर्मचारी पगाराविना राहतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
कर्मचाऱ्यांच्या लक्षात येवू लागलंय की विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कर्मचाऱ्यांचे विविध गट भेटतायत. प्रत्येक आत्महत्तेला एसटी संपासोबत जोडलं जातंय. कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे पण काही जण त्यांना अडवत आहेत असंही अनिल परब म्हणाले होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्रही सुरूच
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या काही थांबताना दिसत नाहीयेत. शुक्रवारी (7 जानेवारी) नांदेड जिल्ह्यात आणखी एका एसची कर्मचाऱ्याने आत्महत्याकेल्याची घटना घडली आहे. पंधरा दिवसापूर्वी भीमराव सदावर्ते नामक एस टी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येची ही नांदेडमध्ये दुसरी घटना आहे. यापूर्वी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.