मुंबई, 11 जून- महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या हिताचा विचार केला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन म्हणून देण्यास शासन सकारात्मक असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्ट मंडळासोबत मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त इंद्रा मालो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम यांच्यासह समितीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. मानधन हे कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाही. त्यामुळे म्हातारपणी औषधोपचाराचा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी पेंशन आवश्यक असल्याने त्यांना मानधनाच्या पन्नास टक्के पेंशन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासन नेहमी सकारात्मक होते आणि यापुढेही सकारात्मक रहाणार असल्याचे सांगुन माझ्या कार्यकाळात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दोन वेळा ऐतिहासिक मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली आहे.
केंद्र शासनाने सप्टेंबर 2018 मध्ये सेविकांना एक हजार 500 रूपये, मदतनीसांना 750 रूपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना 1250 रूपये मानधन वाढ जाहीर केली होती व ती वाढ 1 ऑक्टोबर 2018 पासून देण्याचे मान्य केले होते. ही वाढ त्यांना मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून वाढीव मानधन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत