राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन', महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन', महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 100 कोटीचा बोजा पडणार आहे. १ जुलै, २०१७पासून ही वाढ लागू होणार आहे.

  • Share this:

19 फेब्रुवारी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, येत्या एक-दोन दिवसांतच तो जाहीर केला जाईल. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 100 कोटीचा बोजा पडणार आहे.  १ जुलै, २०१७पासून ही वाढ लागू होणार आहे. राज्य सरकारच्या १९ लाख कार्यरत आणि निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वर्षातून दोनदा म्हणजे १ जानेवारी आणि १ जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १३६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणाऱ्या वाढीव भत्त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना १४० टक्के महागाई भत्ता मिळेल. म्हणजे 4 टक्के वाढवण्यात आलाय. यामुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा सुमारे १०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याबाबतच्या निर्णयावर मुख्य सचिवांनी शिक्कामोर्तब केले असून, अर्थमंत्र्यांनीही त्यास संमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच येत्या एक-दोन दिवसांत हा निर्णय जाहीर होईल.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पे बँड आणि ग्रेड पे याच्या १३६ टक्के महागाई भत्ता मिळतो. १ जानेवारी, २०१७ पासून महागाई भत्त्यात झालेली वाढ ऑगस्ट, २०१७मध्ये लागू झाली. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमधील थकबाकी अद्याप सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी आहे.

तसंच जुलै, २०१७ पासूनच्या महागाई भत्त्याची वाढ ही चालू महिन्यात जाहीर होणार असल्यामुळे मागील आठ महिन्यांचीही थकबाकी द्यावी लागणार आहे. ही थकबाकीच सुमारे दोन हजार कोटी रुपयांची होणार आहे. सध्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ही थकबाकी देणे हे सरकारसमोर मोठेच आव्हान ठरणार आहे.

First published: February 19, 2018, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading