19 ऑक्टबर: 60 तास उलटले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजून कायम आहे.यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यभर अनेक प्रवाशांची गैरसोय होते आहे.
ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सातवा वेतन आयोग लागू व्हावा ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.दरम्यान यासाठी करण्यात आलेला संप आता चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका कर्नाटक राज्यातील एसटी आगारांनाही बसलाय. गेल्या तीन दिवसांपासून बेळगावसह सीमा भागातून एक ही कर्नाटक एसटी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली नाही. बेंगलोर आणि बेळगाव या भागातून महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई , औरंगाबाद , सोलापूर या भागात जवळपास सहाशे फेऱ्या होतात. पण गेल्या तीन दिवसांपासून 1 ही फेरी महाराष्ट्रात झालेली नाही. त्यामुळे कर्नाटक आणि सीमाभागातून कोल्हापूर, सांगली भागात दिवाळीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचा फटका कर्नाटक राज्यातल्या सीमाभागातल्या सगळ्याच आगारांना बसलाय. संपाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मध्ये कर्नाटक एसटी गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळानेही एकही गाडी महाराष्ट्रामध्ये पाठवलेली नाही. परिणामी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप मिटल्यावरच कर्नाटक आगाराच्या एसटीच्या फेऱ्या महाराष्ट्र मध्ये सुरू होणार आहेत.
उस्मानाबादमध्ये ग्रामीण भागातील प्रवसांचे प्रचंड हाल सुरू आहेत. बस स्थानकात तासनतास बसून बस लागतच नसल्याने प्रवाश्यांनी आता बस स्थानकात येणंच बंद केलं आहे. एरवी प्रवाशांनी गजबजून गेलेले बसस्थानक आज ओस पडले आहेत. तर दुसरीकडे याच गोष्टीचा फायदा खाजगी वाहतूकदार घेत असून प्रवाश्यांकाडून प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. त्यामुळे शासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून संप मिटवावा अशी मागणी प्रवाशी करत आहेत.