एसटीची नवी कल्पना, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करणार ट्रकची निर्मिती; तोटाही निघणार भरून

एसटीची नवी कल्पना, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करणार ट्रकची निर्मिती; तोटाही निघणार भरून

आता रस्त्यावरून एसटीचा ट्रकही धावणार आहे. यातून शेतकऱ्यांनाही मोठी मदत होऊ शकणार आहे.

  • Share this:

पुणे, 27 मे : लॉकडाऊनच्या काळात एसटीची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटीला कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. सध्या काही ठिकाणी एसटीची तुरळक सेवा सुरु करण्यात येत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने हा तोटा कमी करण्यासाठी "एसटी ट्रकची" निर्मिती करण्याची योजना आखली आहे.

ग्रामीण भागातील शेतमाल व इतर व्यापारी वर्गाला वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून एसटी ट्रकची व्यवस्था करण्यात आली असून अगदी माफक दरात ही मालवाहतुकीची सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राजगुरुनगर आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे यांनी 'News 18 लोकमत'ला दिली.

लॉकडाऊन व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतमाल व इतर वाहतुकीला शेतकरी व व्यापारी वर्गाला अडचणी येत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून एसटी महामंडळाच्या दापोडी (पुणे) येथील विभागीय कार्यशाळा कार्यलयात या विशेष ट्रक तयार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे सद्य स्थितीत असलेल्या बसमधूनच या मालवाहतूक एसटी ट्रकची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी बसमध्ये असलेली बैठक व्यवस्था काढून टाकण्यात येणार आहे.

पुढील सात ते आठ दिवसांत ही सेवा कार्यरत करण्यात येणार आहे आणि पुणे जिल्ह्यात सर्वात आधी ही वाहतूक सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात प्रत्येक एसटी डेपोला 1 किंवा 2 बस देण्यात येणार आहेत. या एसटी ट्रकचा शेतकरी व व्यापारी वर्गाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यवस्थापक रमेश हांडे यांनी व्यक्त केला.

एसटीची मालवाहतूक सेवा सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी व इतर व्यापारी यांच्यासाठी ही सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या मालवाहतुकीचे दर अजून निश्चित करण्यात आले नाहीत. हे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असतील, असं सांगण्यात येत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 27, 2020, 8:28 AM IST
Tags: st bus

ताज्या बातम्या