• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • STच्या मालवाहू ट्रकला टिप्परने धडक दिल्याने अपघात, मात्र नंतर मोठा अनर्थ टळला!

STच्या मालवाहू ट्रकला टिप्परने धडक दिल्याने अपघात, मात्र नंतर मोठा अनर्थ टळला!

Washim ST Bus Accident : समोरून येणाऱ्या एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

  • Share this:
वाशिम, 14 मार्च : एसटीच्या मालवाहू ट्रकला (ST Truck) टिप्परने धडक दिल्याची घटना आज रविवारी रिसोड लोणी मार्गावरील भर जहागीर नजीक असलेल्या आसरा माता मंदिराजवळ घडली आहे. या अपघातात (Accident) मालवाहू एसटी ट्रकचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याच वेळी समोरून येणाऱ्या एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. एसटी महामंडळाचा एसटी ट्रक क्र एम एच 40 एन 85 35 हा लोखंडी सळ्या घेऊन हिंगोली जिल्ह्यातील सेनगावकडे जात होता. तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव असलेल्या एका रेतीच्या टिप्पर क्रमांक एम एच 25 यु 2599 याने एसटीच्या ट्रकला मागील उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी ट्रकचा पत्रा चिरला असून मोठं नुकसान झालं आहे. अपघातामुळे टिप्परमधील चालकाचा सहकारीही किरकोळ जखमी झाला आहे. मोठा अपघात टळला! टिप्पर आणि एसटीच्या ट्रकमध्ये जोरदार अपघात होऊनही मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार भरधाव वेगाने जाणारा टिप्पर हा एसटी ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक समोरून दुसरी एक महामंडळाची एसटी बस आली आणि टिप्पर चालकाचं नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने एसटीच्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली. हेही वाचा - माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित काँग्रेसच्या बैठकीत राडा, पाहा VIDEO यावेळी समोरून येणाऱ्या एसटी बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला आहे .वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते लोणार या राज्य महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातून टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत आहे. रेती वाहतूक करताना अनेक टिप्पर चालक आपले वाहने सुसाट वेगाने चालवत असतात. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच भर जहांगीर परिसरातील आसरामाता संस्थान इथं भाविकांची कायम वर्दळ असते. त्यामुळं या महामार्गाने भरधाव वाहन चालवणे हे एखाद्या मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे टिप्पर चालकांच्या वाहनावरील वेगावर नियंत्रण ठेवावं, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून प्रशासनाला होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: