OPINION : वसंतसेना ते पृथ्वीराज... शिवसेनेचं पहिल्यापासूनच पडद्यामागे काँग्रेससोबत सख्य

OPINION : वसंतसेना ते पृथ्वीराज... शिवसेनेचं पहिल्यापासूनच पडद्यामागे काँग्रेससोबत सख्य

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एकीकडे महाराष्ट्रातले आमदार आणि दुसरीकडे केरळमधला गट या दोघांमुळे सोनिया गांधी अडचणीत सापडल्या होत्या.

  • Share this:

रशीद किडवई

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एकीकडे महाराष्ट्रातले आमदार आणि दुसरीकडे केरळमधला गट या दोघांमुळे सोनिया गांधी अडचणीत सापडल्या होत्या. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका जगजाहीर आहे आणि त्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा देणं काँग्रेससाठी कठीण होतं. शिवसेना आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत शिवसेनेने दाक्षिणात्य, मुस्लीम, बिहारी आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात मोठी मोहीम चालवली होती. पण आता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने काँग्रेसला या आघाडीचा विचार करावा लागला.

दंगलींचा इतिहास

शिवसेना आणि राष्ट्रवादीची चर्चा सुरू असताना काँग्रेसनेही या आघाडीत सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसमध्ये वेगवेगळे युक्तिवाद केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन संघ, हिंदू महासभा आणि विश्व हिंदू परिषद या कोणत्याही संघटनेशी शिवसेनेचे अधिकृत संबंध नाहीत. महाराष्ट्रामधल्या काही दंगली भडकवण्याचा आरोप शिवसेनेवर आहे. यामध्ये 1960, 1984 ची भिवंडी दंगल, मुंबईतली 1992-93 तली दंगल यांचा समावेश आहे.

हे सगळं पाहता काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर त्याची उत्तरं काँग्रेसला द्यावी लागतील, असं काँग्रेस नेत्यांचं मत होतं. काँग्रेसमधले ए.के. अँटनी, के. सी. वेणूगोपाल हे केरळचे नेते सोनिया गांधींना याबद्दल सावधानतेचा इशारा देत असावेत.

नव्या आमदारांचा कल

दुसरीकडे महाराष्ट्रातले नव्याने निवडून आलेले काँग्रेसचे आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेस आमदारांनी बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करावी आणि नंतर मंत्रिपदासाठी वाटाघाटी कराव्या, असं त्यांचं म्हणणं होतं.

या सगळ्या परिस्थितीत सत्तेत थेट सहभाग घेतला तर स्थैर्यही राहील, असंही या सगळ्या आमदारांना वाटलं. बाहेरून पाठिंबा दिला तर तो काही प्रमाणात अनिश्चित आणि अडचणीचा ठरेल. हे पक्षाच्याही हिताचं नाही, असंही त्यांना वाटत होतं.

(हेही वाचा : शिवसेनेचं सरकार येणार का? महाराष्ट्रात आता उरल्यात 4 शक्यता)

वसंतसेना

जयपूरमधल्या एका काँग्रेस आमदाराने महाराष्ट्रात शिवसेनेचा उदय कसा झाला ते सांगितलं. त्यांच्या मते, मोरारजी देसाई, कृष्ण मेनन यासारख्या नेत्यांशी असलेल्या सत्तास्पर्धेत काँग्रेसने शिवसेनेचा राजकीय वापर करून घेतला.

हिंदुहृ्दयसम्राट : शिवसेनेने मुंबईला कसं कायमचं बदलून टाकलं? (Hindu Hriday Samrat: How The Shiv Sena Changed Mumbai Forever)या बाळासाहेब ठाकरेंवरच्या चरित्रात लेखिका सुजाता आनंद यांनी याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मागण्या उचलून धरल्या. त्यामुळेच शिवसेनेला वसंतसेना म्हटलं जायचं. स्थानिक लोकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा शिवसेनेचा अजेंडा या नेत्यांनी स्वीकारला. मुंबई आणि महाराष्ट्रात गुजराथी, पारशी, सिंधी आणि बोहरा मुस्लीम यांच्या वाढत्या वर्चस्वाचा फटका वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील या दोघांनीही बसला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी परप्रांतियांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेचा काँग्रेसला मोठा फायदा झाला.

सेनेची काँग्रेसला मदत

शिवसेनेनेही काँग्रेसला 1967 च्या लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते व्ही. के. कृष्ण मेनन यांना पक्षाने तिकीट नाकारलं. त्यामुळे ते ईशान्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. आपण पंडित नेहरूंच्या किती जवळ आहोत हाच त्यांचा प्रचाराचा अजेंडा होता.

'नेहरूंचं व्हिजन, मेनन यांचं मिशन' असे बॅनर त्यांनी लावले होते. या बॅनरमध्ये त्यांनी नेहरूंच्या चित्राजवळ स्वत:चा फोटो दाखवला होता. इंदिरा गांधींनी मात्र कृष्ण मेनन यांना एकटं पाडलं होतं. काहीही करून या माजी संरक्षण मंत्र्यांना हरवायचंच असा चंग इंदिरा गांधींनी बांधला होता. यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना आणि मार्मिकच्या माध्यमातून काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांचा प्रचार केला. मतदानाच्या आदल्या दिवशी मार्मिकने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं. यामध्ये कृष्ण मेनन हे दोन परदेशी मुलींच्या खांद्यावर हात ठेवून बसल्याचं चित्र होतं. त्याखाली एक ओळ लिहिली होती... 'या कारणामुळेच कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्री बनायचं होतं.' या निवडणुकीत स. गो. बर्वे यांचा विजय झाला.

(हेही पाहा : VIDEO : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय ठरलं? नवाब मलिक म्हणाले...)

वाचा आणि गप्प बसा

बाळासाहेब ठाकरेंनी फ्री प्रेस जर्नलची नोकरी सोडून 'मार्मिक' या साप्ताहिकाच्या माध्यमातून परप्रांतियांच्या विरोधात टिकेची झोड उठवली. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना कसं डावललं जातंय हे त्यांनी सांगितलं. त्यांची 'वाचा आणि गप्प बसा' यासारखी शीर्षकं प्रचंड गाजली.

दाक्षिणात्यांना लक्ष्य करून त्यांनी 'बजाव पुंगी, हटाव लुंगी' अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळेच ए.के. अँटनी, के. सी. वेणूगोपाल या नेत्यांचा शिवसेनेसोबत जाण्याला विरोध असावा.

काँग्रेसचे अनेक जुने नेते शिवसेनेने आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना कसा पाठिंबा दिला हे सांगतात. 31 ऑगस्ट 1975 च्या 'मार्मिक' च्या अग्रलेखात बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला. देशात अशांतता असल्याने आणीबाणी लादणं हा एकमेव पर्याय इंदिरा गांधींकडे होता, असं बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलं होतं.

(हेही वाचा : भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांना फोन, राजकारणात मोठी खळबळ)

अंतुले आणि भवानी तलवार

त्याचबरोबर 1980 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. ए. आर. अंतुले हे बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होते. ते 1980 ते 1982 या काळात मुख्यमंत्री होते. अंतुलेंनी तेव्हा यूकेमध्ये असलेली शिवाजी महाराजांची भवानी तलवार परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं.

1990 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात असताना अंतुलेंनी आपण शिवसैनिक असल्याचं जाहीर करून काँग्रेस नेत्यांना मोठा धक्का दिला होता. एका मुलाखतीत ते म्हणाले, मला अब्दुल रहमान असं म्हणण्यापेक्षा ए. आर. अंतुले म्हणा. माझी धार्मिक ओळख नको.

सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

शिवसेनेने 2007 आणि 2012 मध्ये काँग्रेसचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. त्यावेळी राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. बाळासाहेब ठाकरेंना सरकारी इतमामात निरोप देण्यात आला. तिरंग्यामध्ये लपटेलेल्या बाळासाहेबांच्या पार्थिवाला बंदुकांच्या फैरींची सलामीही देण्यात आली.

पंतप्रधानपदासारखं घटनात्मक पद भूषवणाऱ्या व्यक्तींनाच असा सन्मान देण्यात येतो. पण महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका सहन करूनही बाळासाहेब ठाकरेंवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले. जनभावनेचा आदर करून आपण हा निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण यांचा आग्रह

हेच पृथ्वीराज चव्हाण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीला काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी आग्रही आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठीही त्यांचं नाव घेतलं जातंय. त्याचवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्यांची एक मोठी यादी आहे. या सगळ्या गोष्टी पाहता सोनिया गांधींवर शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी मोठा दबाव होता.

=========================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या