साखरेची भाववाढ औटघटकेची ठरणार?

साखरेची भाववाढ औटघटकेची ठरणार?

केंद्र सरकारने देशातल्या साखर उद्योगाच्या प्रमुख 5 पैकी जेमतेम 2 मागण्या मान्य केल्या आहेत. परिणामी साखरेचे प्रतिक्विंटल 700 रुपयांनी घसरलेले भाव 400 रुपयांनी वधारण्यास मदत झालीये.

  • Share this:

बालाजी निरफळ-संदीप भुजबळ, मुंबई

23 फेब्रुवारी : केंद्र सरकारने देशातल्या साखर उद्योगाच्या प्रमुख 5 पैकी जेमतेम 2 मागण्या मान्य केल्या आहेत. परिणामी साखरेचे प्रतिक्विंटल 700 रुपयांनी घसरलेले भाव 400 रुपयांनी वधारण्यास मदत झालीये.

या भाववाढीमुळे सध्या साखरेच्या पोत्याचे बँकेकडून होणारे मूल्यांकणही वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्यासाठी फायदा होऊ लागला आहे. पण केंद्र सरकारने साखरेच्या आयातशुल्कात केलेली वाढ ही जेमतेम 2 महिन्यांपुरती आहे.

तसंच सरकारने साखर साठ्यांच्या विक्रीवर घातलेले निर्बंधदेखील 2 महिन्यांच्या कालावधीचे आहेत. तर येणाऱ्या महिनाभरात देशातल्या साखरेच्या साठ्याचा अंतिम अंदाज येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत देशात अंदाजे 50 ते 55 लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त साखरेचा साठा होण्याची शक्यता साखर धंद्यातले जाणकार आणि वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी बी ठोंबरे यांनी वर्तवली आहे.

या अतिरिक्त साखरेचा बाजारातून वेळीच उठाव झाला नाही तर साखरेचे प्रतिक्विंटल 400 रुपयांनी वाढलेले भाव दर पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे पुन्हा अवघड होण्याची शक्यता ठोंबरे यांनी वर्तवली आहे.

केंद्र सरकारने साखरपेरणी केली असली तरी ती मोजक्या कालावधीसाठी केली आहे. त्यामुळे साखरउद्योग आणि उसउत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जातेय. ही परिस्थिती सुधारण्यासाठी साखर उद्योगाने काही प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

सरकारकडे प्रमुख मागण्या

1. साखरेच्या आयातशुल्कवाढीची सध्याची मर्यादा आणखी वाढवावी.

2. साखरेच्या स्टॉक लिमीटचा कालावधी वाढवावा.

3. सरकारने पीडीएससाठी साखरेची  खरेदी खुल्या बाजाराऐवजी थेट कारखान्यांकडून करावी.

4. सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा.

5. साखरेचे सध्याचे निर्यातअनुदान वाढवावे.

6. साखरेला प्रतिटन दीड ते 2 हजार रुपये वाहतूक अनुदान  द्यावे.

7. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीदेखील अतिरिक्त साखरेची खरेदी करावी.

सरकारने या मागण्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले आणि त्या वेळीच पूर्ण केल्या तरच यंदा साखरेचा आलेला पूर शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान करेल. अन्यथा साखरेचे अतिरिक्त उत्पादन, पडलेले बाजारभाव पुढीलवर्षीदेखील ही समस्या गंभीर होण्यास हातभारच लावतील.

साखर पिकली

यंदा देशात 265 लाख टन साखरेचा अंदाज

महाराष्ट्राचे साखर उत्पादन अंदाजे 80 ते 85 लाख टनांवर जाणार

First published: February 23, 2018, 11:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading