SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला विजयसिंह मोहिते का झाले नकोसे?

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला विजयसिंह मोहिते का झाले नकोसे?

राष्ट्रवादीत विजयदादा आणि अजितदादांचं कधीच पटलं नाही. किंबहुना सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटलांचं राजकीय वर्चस्व मोडून काढण्यात अजितदादांचा मोठा हातभार आहे.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 27 डिसेंबर : 'मी अजून राष्ट्रवादीतच आहे. असं विजयसिंह मोहिते पाटील कितीही ठासून सांगत असले तरी राष्ट्रवादी मात्र, अजूनही त्यांना आपलंसं करून घ्यायला तयार नाही. कदाचित म्हणूनच पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर या विजयदादांवर टीका करण्यासाठी स्वतःहून पुढे आल्यात. अजितदादा तर विजयदादांचा विषय काढताच झुरळागत झटकून टाकल्यासारखं बोलत आहेत.

वसंतदादा शुगर इनस्टिट्युटच्या कार्यक्रमात विजयदादा मोहिते हे शरद पवारांच्या शेजारी जाऊन बसताच, ते भाजपात नाराज असल्याचं स्पष्ट झालं होतं. पवारांनी मग आपुलकीने विचारपूस करत विजयदादांच्या ज्येष्ठतेचा सन्मान राखला. भले मग त्यांचा मुलगा रणजितसिंह हा भाजपात का असेनात. विजयदादांनीही मग मी अजून राष्ट्रवादीतच असल्याचं सांगून सगळ्यानाच बुचकाळ्यात पाडलं. माझा मुलगा भाजपात गेला असला तरी मी अजूनही राष्ट्रवादीतच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

राज्यात सत्तांतर होताच विजयदादा पुन्हा राष्ट्रवादीच्या जवळ जाऊ पाहत असले तरी पक्ष मात्र अजूनही त्यांना पुन्हा आपलंसं करायला तयार नाही. पण विजयदादांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बरं नाही म्हणून मग दुसऱ्या फळीतील रुपाली चाकणकर यांना पुढे करण्यात आलं. लोकसभा आणि विधानसभेला विजयदादांना राष्ट्रवादीची आठवण का झाली नाही, अशी बोचरी टीका चाकणकर यांनी मोहिते पाटलांवर केली.

अजितदादांनी तर विजयदादांचा विषय काढताच झुरळासारखं झटकून टाकलं. प्रत्येक विषयावर मी बोलणं गरजेचंच आहे का, थेट त्यांनाच विचारा की, असा त्रागा अजितदादांनी केल्याचं बघायला मिळालं.

राष्ट्रवादीत विजयदादा आणि अजितदादांचं कधीच पटलं नाही. किंबहुना सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटलांचं राजकीय वर्चस्व मोडून काढण्यात अजितदादांचा मोठा हातभार आहे. पक्षातील मोहिते पाटील विरोधकांना राजकीय ताकद दिल्यानेच लोकसभेला मोहिते पाटलांचे युवराज रणजितसिंह भाजपात डेरेदाखल झाल्याचं जगजाहीर आहे. पण तरीही विजयदादा अजूनही तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच आहेत. पण त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला भाजपच्या पाठीशी आपली राजकीय ताकद उभी केल्याचं जगजाहीर आहे. त्याच जोरावर लोकसभेला माढ्यातून भाजपचा खासदार निवडून आलाय.

विधानसभेलाही माळसिरसमधून भाजपचा उमेदवार विजयदादांनीच निवडून आणलाय. त्याबदल्यात भाजपने मात्र मोहिते-पाटलांना अद्याप कुठलंच राजकीय लाभाचं पद दिलेले नाही. म्हणूनच भाजपात अस्वस्थ असलेल्या विजयदादांनी आगामी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न चालवलाय. पण राष्ट्रवादीला विजयदादांना पक्षात पुन्हा सक्रीय घेण्यात अजिबात रस नाही. कदाचित म्हणूनच रूपाली चाकणकरमार्फत विजयदादांचा पाणउतारा केला जात आहे.

आता मोहिते-पाटील समर्थक या अपमानाचा नेमका कसा बदला घेतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटलांविषयी राजकीय सहानुभूती असलेला मोठा वर्ग आहे.

First Published: Dec 27, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading