SPECIAL REPORT : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 'या' आहे 6 शक्यता

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 08:49 PM IST

SPECIAL REPORT : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 'या' आहे 6 शक्यता

मुंबई, 01 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापन कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजप शिवसेनेतल्या मतभेदांमुळे सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी सहा शक्यतांची चर्चा सुरू आहे.

राज्यातला सिंहसनाचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी हट्टाला पेटले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दिवस लांबत चाललाय. पण, सत्ता स्थापण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. त्यासाठी विविध शक्यता अजमावल्या जात आहेत.

पहिली शक्यता

भाजप-शिवसेनेचं मनोमीलन होईल. शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारेल अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मात्र, असं झालं नाही तर दुसऱ्या शक्यतेचा विचार केला जाईल.

Loading...

दुसरी शक्यता

शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिल्यास, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेचा दावा करावा लागेल आणि 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागेल. परंतु, सर्व अपक्षांनी पाठिंबा दिला तरीही 145 चा आकडा त्यांना गाठता येऊ शकत नाही. अपक्ष आणि इतर अशा एकूण 29 जणांचा पाठिंबाही उपयोगाचा ठरणार नाही. अशावेळी, भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागू शकते. बहुमत चाचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपच्या सरकारवरील धोका टळेल. मात्र अशा परिस्थितीत स्थिर सरकार देणं अत्यंत कठीण असेल.

तिसरी शक्यता राजकारणात गदारोळ उडवून देणारी असली तरी राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शिवसेनेतील आमदारांचा गट फोडून भाजप बहुमत सिद्ध करू शकतं. ही शक्यताही नाकारता येत नाही.

चौथी शक्यता शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे.

देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील किंवा बाहेरून पाठिंबा देतील.

पाचवी शक्यता - भाजप आणि शिवसेनेप्रमाणे आघाडीलाही सरकार स्थापन करण्याची संधी असलेली पाचवी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे 54 आमदार आणि काँग्रसचे 44 आमदार या जोरावर सरकार स्थापन करेल आणि शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देईल. आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं जाईल. तर वरील पाच शक्यता प्रत्यक्षात आल्या नाही तर सहावी शक्यता पुढील प्रमाणे असेल.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर सर्वाधिकार राज्यपालांना मिळतील. भाजपासाठी ती मोठी नामुष्की असेल. मात्र हा पर्यायही त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे.

एकंदरीतच राज्यात सरकार स्थापन होताना या सहा शक्यता आजमावून पाहिल्या जात आहेत. आता यातली कोणती शक्यता सरकार स्थापन करायला मदत करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...