SPECIAL REPORT : सोन्यावर भरोसा हाय ना! गुगल मॅपलाही मागे टाकेल असा हा बैल

SPECIAL REPORT : सोन्यावर भरोसा हाय ना! गुगल मॅपलाही मागे टाकेल असा हा बैल

डेअरीवर दूध घालण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत: पायी अथवा वाहनावर दुधाचे कॅन घेऊन जावं लागतं. मात्र, सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला दूध पोहचवण्यासाठी माणसाची गरज भासत नाही.

  • Share this:

असिफ मुरसल, सांगली

सांगली, 12 जून : डेअरीवर दूध घालण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत: पायी अथवा वाहनावर दुधाचे कॅन घेऊन जावं लागतं. मात्र, सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला दूध पोहचवण्यासाठी माणसाची गरज भासत नाही. कारण त्यांचा सोन्या बैल गेल्या आठ वर्षापासून डेअरीवर दूध पोहोचवण्याचं काम करतोय.

दुधाचे कॅन घेवून रस्त्यानं जाणारी ही बैलगाडी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे या बैलगाडीत दुधानं भरलेले कॅन आहेत मात्र बैलगाडी हाकणाराचा मात्र पत्ता नाही. बिना चालकाची ही बैलगाडी दुध डेअरीच्या दिशेनं निघाली. खरंतर बैलगाडी हाकणाऱ्यांनी कासरा धरल्याशिवाय बैल जागचे हालत नाहीत.

मात्र, काळमवाडीतील हा सोन्या त्याला अपवाद ठरला आहे. मालकानं बैलगाडीत एकदा दुधाचे कॅन बैलगाडीच टाकले की सोन्या मालकाशिवाय बैलगाडी थेट दुधडेअरीपर्यंत घेऊन जातो. वाळवा तालुक्यातील काळमवाडीत राहणाऱ्या शिवाजी साळुंखे यांच्या मालकीचा हा बैल असून गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सोन्या इमाने इतबारे एकट्यानं डेअरीत जावून दुध घालण्याचं काम करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र वाटेनं बैलगाडी घेऊन जाताना तो वाहतूकीचे सगळे नियम पाळतो.

सकाळी आणि संध्य़ाकाळी असं दिवसातून दोन वेळा चारशे लिटर दूध डेअरीला घेवून जाण्याचं काम हा सोन्या करतो. साळुंखे यांच्या वस्तीपासून तीन किलो मीटर अंतरावर ही डेअरी असून वाटेतील सगळे अडथळे आणि वाहने चुकवत तसेच दुध न सांडवता तो डेअरीत दुध पोहोचवतं करतो. शेतातून जातानाही तो आजू-बाजूच्या पिकांना तोंड लावत नाही ही त्याची खासीयत आहे.

गावातून जातानाही नेमकं कोणत्या गल्लीत कुठे वळायचे? डेअरीकडं जाणारा रस्ता कोणता आहे? याची त्याला पुरेपूर माहिती आहे.

दूध डेअरीवरही लोक सोन्याची वाट पाहात असतात. त्याच्या या हुशारीमुळं गावातील लहान थोरांना त्याचा लळा लागला आहे. डेअरीवर दुध घातलं की, सोन्या मोकळे कॅन घेऊन पुन्हा घराच्या दिशेनं निघतो. एखाद्या माणसाप्रमाणे सोन्या ही ड्युटी बजावतोय.

सोन्या हा देशी बैल असून गेल्या 10 वर्षांपासून साळुंखे कुटुंबीयांनी त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला आहे. शिवाजी साळुंखे यांची 10 एकर शेती असून चाळीस गाई आणि म्हशी आहेत. सुरुवातीपासून तो हुशार असून एके दिवशी आठ वर्षांपूर्वी तो एकटाच बैलगाडीत दूध घेवून डेअरीत पोहोचला होता. त्यानंतर हळूहळू त्याला ती सवय लागली. गेल्या आठ वर्षात तो या कामात चांगलाच पटाईत झाला असून पंचक्रोषीतील लोकांसाठी तो आयडॉल ठरला आहे.

======================================

First published: June 12, 2019, 8:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading