SPECIAL REPORT : भाजपच्या खेळीमुळे पुण्यात शिवसेना 'उणे', कार्यालयाला टाळं लावून शिलेदार 'मातोश्री'वर!

SPECIAL REPORT : भाजपच्या खेळीमुळे पुण्यात शिवसेना 'उणे', कार्यालयाला टाळं लावून शिलेदार 'मातोश्री'वर!

पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून 'मातोश्री'वर जाऊन बसले आहे. तर दुसरीकडे भाजपमध्येही बंडोबांनी दंड थोपडले आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता आणि वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 01 ऑक्टोबर : पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून मातोश्रीवर जाऊन बसलेत. तर दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादांपाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला आहे.

पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने सेना भवनाला हे असं भलं मोठं टाळं लागलंय. नाराज पक्ष कार्यकर्ते 'मातोश्री'वर जाऊन बसलेत शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा करून टाकली. शिवतारे मात्र, या पुणे शहर सेनेच्या या खच्चीकरणाबद्दल सरळ कानावर हात ठेवत आहेत.

पुण्यात सेनेच्या कार्यालयाला अवकळा आलेली असताना तिकडे भाजपात मात्र, बंडखोरीला ऊत आला आहे. शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी जाहीर होताच काही भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय.

तर कोथरूडमध्येही चंद्रकांतदादांना होणारा विरोध काही केल्या कमी होताना दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही स्वाभिमानीकडून आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा झाल्याची फेसबुक पोस्ट टाकून आपलं नावं चर्चेत आणलंय. याउलट चंद्रकांतदादा मात्र, आपण पुणेकरांसाठी उपरे नसल्याचा दावा करत आहेत.

2009 साली पुण्यात कोथरूड आणि हडपसरमध्ये सेनेचे आमदार होते. त्यामुळे दोन मतदारसंघातून युतीबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे 'मातोश्री'कडून मूक संमती मिळाली तर कदाचित या दोन ठिकाणांहून नक्कीच सेनेचे इच्छूक बंडखोरी करू शकतात.

पाहुयात नेमकं काय होतंय ते...पण यानिमित्ताने युतीमध्ये सेना पुरती हतबल झाल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय असंच म्हणावं लागेल.

========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या