SPECIAL REPORT : पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय?

SPECIAL REPORT : पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय?

गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे -ठाकरे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना आपला भाऊ मानलंय.

  • Share this:

 

मुंबई, 02 डिसेंबर : पंकजा मुंडे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतीचं त्यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट केली. त्यानंतर या चर्चेला उधाण आलंय.

राज्यातील सत्तासंघर्षात तोंड पोळालेल्या भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीनंतर पंकडा मुंडे यांनी  स्वत:ला राजकीय चर्चेपासून अलिप्त ठेवलं होतं. मात्र, आता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्या आपल्या समर्थकांशी  संवाद साधणार आहेत. त्याविषयी त्यांनी  फेसबूकवरून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...

त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांविषयी बोलतेय.

तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे.

नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

या फेसबुक पोस्टपाठोपाठ आता त्यांच्या  ट्विटर हँडलवरून भाजप नेत्या हा उल्लेखही  गायब झालाय. तसंच फेसबुक पोस्टमध्ये मावळे असा उल्लेख केल्यामुळं त्या  सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

ही चर्चा सुरू झाल्यानंतर त्याचं खंडण करण्यासाठी भाजपनं राज्यातील बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरवली. भाजप प्रदेशाध्यक्षांनी खास पत्रकार परीषद घेऊन या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

खरंतर कधी काळी महाराष्ट्र महाजन - मुंडे या जोडीनं भाजपामध्ये एकहाती सत्ता राबवली होती. मात्र,  प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या वर्चस्वाला हादरे बसायला सुरूवात झाली. पक्षात एकाकी पडलेल्या गोपीनाथ मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी झाली होती. त्यामुळेच एकदा नव्हे तर दोनवेळा त्यांनी बंडाचा झेंडा फडकाविला होता. एकवेळा  तर ते काँग्रेसच्या दारात जाऊन परत फिरल्याची चर्चा त्याकाळी रंगली होती. आता तशीचं चर्चा पंकजा मुंडे यांच्या विषयी सुरू झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे -ठाकरे कुटुंबाचे  जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना आपला भाऊ मानलंय. त्यामुळेच २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सेना- भाजप युती तुटली असतानाही  शिवसेनेनं पंकजा यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. तसंच प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांना मदत केली  होती. पक्षांतर्गत कुरघोडीमुळेच परळी  विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा  पराभव झाल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

हीच ती वेळ हाच तो क्षण असं कॅम्पेन त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडिया सुरु करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर येत्या १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Published by: sachin Salve
First published: December 2, 2019, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading