SPECIAL REPORT : शरद पवारांना ईडीची 'शिडी' फायद्याची ठरणार का?

SPECIAL REPORT : शरद पवारांना ईडीची 'शिडी' फायद्याची ठरणार का?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या कारवाईचा मुद्दा पेटवण्याचा राष्ट्रवादीनं आटोकाट प्रयत्न केला. कुठलीही नोटीस नसताना शरद पवारांनी स्वत:हून ईडीसमोर हजर राहाण्याची घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजवणी संचलनालयानं शरद पवार यांच्यासह राज्यातील दिग्गत नेत्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्वत:हून ईडीच्या समोर हजर होण्याची ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली. पण मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा बेत रद्द केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या कारवाईचा मुद्दा पेटवण्याचा राष्ट्रवादीनं आटोकाट प्रयत्न केला. कुठलीही नोटीस नसताना शरद पवारांनी स्वत:हून ईडीसमोर हजर राहाण्याची घोषणा केली. त्यामुळे मुंबईत मोठा पॉलिटिकल ड्रामा होणार हे उघड होतं. त्यामुळे पोलिसांनी मुंबईतील काही भागात जमावबंदी लागू केली.

तसंच अनेक भागात नाकाबंदीही केली. त्यात शरद पवारांनीही कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयाबाहेर जमू नये, असं आवाहन केलं. तरीही आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वातावरण तापवत पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या या खेळीवर भाजपनं खोचक टोला लगावला.

दरम्यान, तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ई-मेल ईडीकडून पवारांना पाठवण्यात आला. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी पवारांचं मन वळवलं. त्यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधत तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचं जाहीर केलं.

ईडी नाट्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.

दरम्यान, राहुल गांधींचं ट्विट सोडलं तर राज्यातले काँग्रेसचे नेते पवारांसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत. ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर स्वत:हून ईडीसमोर जाणार अशी ठाम भूमिका म्हणजे आक्रमण हाच बचावाची पवारांची रणनीती होती. त्यातून राजकीय वातावरण तापवत पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचा पवारांचा प्रयत्न होता. पण सरकारनं तो तडीस जावू दिला नाही. पण येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात या मुद्दावरून राजकारण तापवण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करणार हे नक्की.

==========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading