सागर कुलकर्णी आणि चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 12 जून : फडणवीस सरकारने अखेर बारामतीला नीरा डाव्या कालव्याद्वारे जाणारे नियमबाह्य पाणी तोडलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांसाठी मोठा धक्का आहे.
नीरा देवघर धरणातून नीरा डाव्या कालव्याद्वारे बारामती आणि इंदापूरला जाणारं तब्बल 7 टीएमसी पाणी आता कायमचं बंद झालं आहे. खरंतर 2017 सालीच या 60:40 पाणी वाटपाचा करार संपला होता. तरीही नियमबाह्य पद्धतीनं हे पाणी बारामतीला सुरूच होतं. पण अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील आणि फलटणचे रणजीत निंबाळकर भाजपमध्ये जाताच या दोघांनीही हा मुद्दा उचलून धरला. आता उजव्या कालव्यामार्फत हे पाणी फलटण, सांगोला आणि माळसिरस तालुक्याला मिळणार आहे..
नीरा डावा कालव्यातून जाणारं नियमबाह्य पाणी तोडल्यामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यातल्या शेतीवर परिणाम होणार आहे.
बारामतीवर काय होणार परिणाम?
- नीरा डावा कालव्याचं 7 टीएमसी पाणी तोडल्याने बारामतीच्या सिंचनावर परिणाम होणार
- बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 46 हजार एकर ओलीत क्षेत्र कमी होणार
- सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती साखर कारखान्याचं गाळप क्षेत्र कमी होणार
दरम्यान, पाण्याच्या या सगळ्या राजकारणावर सुप्रिया सुळेंनी मात्र, तुर्तासतरी अधिकचं भाष्य करणं टाळलंय. पण हा पाणी तोडण्याचा निर्णय घेण्याआधी सुप्रिया सुळे देखील सिंचन भवनात कशासाठी आल्या होत्या हे इथं वेगळं सांगायची गरज नाही.
दोन वर्षांपासून डोळेझाक करणाऱ्या भाजपनं पवारांचे शिलेदार भाजपमध्ये येताच पाणीअस्त्र बाहेर काढलं. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच भाजपनं पवारांची पाणीकोंडी केल्याचं बोललं जातं आहे.
=================