शिवाजी गोरे, प्रतिनिधी
दापोली, 09 ऑक्टोबर : प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतं. त्याचप्रकारे निवडणुकीतही सर्व क्षम्य असतं, असं म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार काय काय क्लुप्त्या लढवतील याचा नेम नाही.
अबोली, निळा आणि पांढरा शर्ट परिधान केलेले हे तिघेही दापोली विधानसभा मतदार संघातले उमेदवार आहेत. आता तुम्ही म्हणाल यात काय नवल? मंडळी नवल तर पुढेच आहे. या तिन्ही उमेदवारांचं नाव संजय कदम असं आहे. ही नवलाई इथंच थांबत नाही. या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराविरोधात अर्ज भरला आणि विद्यमान आमदाराचं नावही संजय कदम आहे.
विद्यमान आमदाराला शह देण्यासाठी सारखेच उमेदवार रिंगणात उतरवल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी मैदानात उतरल्याचं उमेदवारांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्हं प्रत्येक उमेदवाराला माहित आहे. मतदार चिन्हं पाहून उमेदवार करतात त्यामुळे विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी केला.
एकच नाव आणि आडनाव असलेले चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सारख्या नावाचे उमेदवार असल्यानं सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
==================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा