SPECIAL REPORT : दीपक केसरकरांच्या 28 वर्षांच्या वर्चस्वाला राणेंनी लावला सुरूंग!

SPECIAL REPORT : दीपक केसरकरांच्या 28 वर्षांच्या वर्चस्वाला राणेंनी लावला सुरूंग!

यापुढच्या काळात दीपक केसरकरांसमोर राजकीय अस्तित्त्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार संजू परब विजयी झाले आहे.  भाजपचा हा विजय दिपक केसरकर यांच्या विरोधात नारायण राणे यांनी मिळवलेला विजय म्हटला जातोय कारण, या निवडणुकीत राणे आणि केसरकर या दोन्ही नेत्यांनी आपापली राजकीय प्रतिष्ठापणाला लावली होती. भाजपच्या या विजयामुळे सावंतवाडी नगर परिषदेची सत्ता भाजपकडे आली आहेच पण त्याचबरोबर दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीवरच्या गेल्या 28 वर्षांच्या वर्चस्वाला राणेनी सुरुंग लावला आहे .

राणेंसाठी का महत्वाची होती ही निवडणूक?

नारायण राणे भाजपात आल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत  नितेश राणेंचा कणकवलीतला विजय वगळता सिंधुदुर्गातल्या दोन्ही विधानसभेच्या जागा आणि रत्नागिरीच्या एका जागेवर शिवसेनेने विजय मिळवला होता.

त्यामुळे राणेंची  भाजप मधली कामगिरी दखलपात्र ठरली नव्हती. पण, राणेंना सोडून नितेश राणेंविरोधात कणकवली विधानसभा लढवण्यासाठी शिवसेनेत गेलेले त्यांचे निकटचे सहकारी सतीश सावंत यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजपचे लॉरेन्स मान्येकर विजयी झाले. त्याआधी बांदा गावच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अक्रम खान निवडून आले आणि आता सावंतवाडी नगराध्यक्षपदावर तर राणेंसमर्थक परब निवडून आले. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झालेत. शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा त्यांनी 313 मतानी पराभव केला.

सावंतवाडीत खरं तर भाजपची पक्ष म्हणून फार ताकद नाही. त्यात भाजपने अन्नपुर्णा कोरगावकर यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. अशा परिस्थितीत राणे केसरकर वादाच्या पार्श्वभूमीवर गेली पंचवीस वर्षं दीपक केसरकरांच्या पाठीशी उभे असलेले सावंतवाडीकर नगराध्यक्ष म्हणून राणे समर्थकाला स्वीकारतील का हा प्रश्न होता. तो निकाली काढण्यात राणेंना यश आल्यामुळे त्यांच्या भाजपमधल्या प्रगती पुस्तकात नक्कीच व्हेरीगुड म्हणून शेरा लिहिला जाईल.

का बसला केसरकरांना दणका : 3 महत्वाचे मुद्दे 

1)  2014 च्या तुलनेत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकरांचं मताधिक्य कमालीचं घटलेलं असलं तरीही केसरकरांना मिळालेल्या एकूण मतात सावंतवाडी शहरातल्या मतांचा मोठा वाटा होता. त्यामुळे ही मतं आपलीच आहेत ती कुठे जाणार नाहीत हे समजून केसरकर गाफील राहिले.

2) महाविकास आघाडीतली बंडखोरी मिटवण्यात केसरकर आणि काँग्रेसचे नेते अपयशी ठरले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप नार्वेकर आणि अपक्ष उमेदवार बबन साळगावकर यांना मिळालेल्या मतात शिवसेनेच्या काही मतांची विभागणी झाली.

3) नितेश राणेंनी भाजपच्या अनुभवी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानच्या राणे समर्थक कार्यकर्त्यांची सगळी यंत्रणा अचूक राबवली. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी एकेएका मताच्या बेगमीसाठी आवश्यक ते सर्व कसब वापरलं आणि यातून भाजपचा हा विजय साध्य झाला.

युती शासनाच्या काळात गृह राज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री ही दोन महत्वाची खाती मिळालेल्या केसरकराना यावेळेच्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र स्थान मिळालेलं नाही.  त्यातच सावंतवाडीही केसरकरांकडून राणेंनी काढून घेतली. त्यामुळे यापुढच्या काळात दीपक केसरकरांसमोर राजकीय अस्तित्त्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या