सोलापूर, 21 सप्टेंबर : राज्यभरात काँग्रेस राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीने सोलापूर जिल्ह्यातही आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. भाजपकडून पुन्हा एकदा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुखांशिवाय सध्यातरी भाजपकडे दुसरा चेहरा या मतदारसंघात नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विजयाने भाजपची प्रचंड मोठी फळी आता या मतदारसंघात निर्माण झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा शिरकाव
2019 च्या लोकसभेमुळे सोलापूर जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडीचा शिरकाव झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूरच्या भूमीपुत्राचा दबलेला आवाजही आता जोर धरु लागला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण नेते मंडळींमध्ये सत्तेसाठी अप्रत्यक्षपणे संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. मतदारसंघात मेळावा करत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांचे जोरदार विरोध सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी भूमिपुत्रांनाच उमेदवारी द्यावी म्हणून स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. माजी आमदार दिलीप माने, स्वामी समर्थ सुत मिलचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्यातील गटबाजीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची वाताहत झाली आणि ती कायम आहे.
प्रस्थापित नेत्यांना पर्याय देण्यासाठी भूमिपुत्रांनी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचं ठरवलं आहे. तर वंचितदेखील उमेदवारीसाठी चाचपणी करत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात धनगर आणि लिंगायत सामुदायाची संख्या प्रचंड आहे. या दोन्ही सामुदायांकडूनदेखील उमेदवारीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांची लढाई कोणाविरुद्ध होते, हे पाहावं लागणार आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेलं मतदान
सुभाष देशमुख, भाजप - 70,077
दिलीप माने, काँग्रेस–42,954
2019 च्या लोकसभेत दक्षिण सोलापूर विधासभेतून उमेदवारांना मिळालेली मतं
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 88,691
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 50,913
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी – 28,092
==================================================================================================
VIDEO : निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा