पुणे, 14 फेब्रुवारी : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. 'सविताभाभी...इथंच थांब!!' या होर्डिंगची चर्चा थांबत नाही तेच 'सॉरी अप्पू' नावाच्या पोस्टर्सनी एकच धुमाकूळ घातला आहे. गमंत म्हणजे, या पोस्टर्समागे एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेमळ कहाणी दडली आहे.
पुण्यातील हडपसरच्या अण्णा साहेब मगर कॉलेजच्या परिसरात व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त बघून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टरर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरवर लग्नाच्या शुभेच्छा देत 'आय लव्ह यू' असं लिहून पठ्ठ्याने जगजाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे. पण, या लग्नाच्या शुभेच्छा ह्या 15 फेब्रुवारी म्हणजे उद्यासाठी दिल्या आहे. विशेष म्हणजे, या पोस्टर्सवर 'सॉरी अप्पू' असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे.
आता हे पोस्टर्स पाहून पुणेकर आणखी बुचक्कळ्यात पडले आहे. आता हा अप्पू कोण? असा प्रश्न पडला आहे. येणारे जाणारे हे पोस्टर्स पाहून काही तरी अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही जणांना हा कॉलेजमधील तरुणांकडून घडवण्यात आलेला प्रकार असावा असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे, याआधीही पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवडे आय एम सॉरी!’ अशा पोस्टर्सचा असाच प्रकार घडला होता. पण, हा प्रताप कुठल्याही कॉलेजच्या तरुणाकडून घडला नसून तो एका डॉक्टराकडून घडला आहे.
डॉक्टर, तुम्ही सुद्धा...
सॉरी अप्पू, म्हणत एका डॉक्टराने आपल्या पत्नीला मनवण्यासाठी हा प्रकार केला आहे. या डॉक्टराची पत्नी सुद्धा डॉक्टर आहे. दोघांमध्ये वाद झाल्यामुळे पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल कोर्टात दावाही दाखल करण्यात आला आहे. आता पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे पती पुरता वैतागून गेला. त्याने पत्नीला घटस्फोट न घेण्यासाठी विनवणी केली. पण, तिने त्याचं काहीही ऐकलं नाही. पत्नीपासून दूर होण्याच्या विचारामुळे तो पुरता हैराण झाला. त्यामुळे आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देण्यासाठी त्याने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधला आणि अण्णा साहेब मगर कॉलेजच्या परिसरात सर्वत्र पोस्टर्स लावून टाकले. प्रेमाने 'आय लव्ह यू' तर म्हटलंच पण जाहीरपणे माफीही मागितली.
पण, झालं उलटचं, पतीच्या या प्रतापामुळे पत्नी चांगलीच भडकली. तिने थेट हडपसर पोलिसांना फोन करून पतीच्या प्रतापाची तक्रार दिली. एवढंच नाहीतर त्याने लावलेले पोस्टर्सही हटवण्यात यावे, अशी मागणीच केली. पत्नीच्या या रौद्ररूपाने आधीच हवालदील झालेल्या पतीला चांगलाच झटका बसला आहे. खरंतर आज प्रेम व्यक्त करण्याचा प्रेमळ दिवस...बघू या, आजच्या या प्रेमळ दिवशी हे डॉक्टर काय 'उपचार' करताय ते...
अखेर पुण्यातील सविताभाभी होर्डिंग्सचं गुढं उलगडलं
दरम्यान, सविताभाभी...तू इथंच थांब! या होर्डिंग्सबद्दल गुढ अखेर उलगडलं आहे. ही अश्लील उद्योग मित्र मंडळ या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे. ही जाहिरात त्यांच्या आगामी सिनेमाची आहे. याशिवाय त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे. यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणतं आहे.
गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही..जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही...असं सई म्हणाली आहे. यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे.
पुण्यातल्या म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिज जवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली होती. या होर्डिंगवर 'सविताभाभी तू इथंच थांब!!' या आशयाचे शब्द या पोस्टरवर आहेत. सविताभाभी तू इथंच थांब म्हटल्याचे होर्डिंग पाहून पुणेकरांचे पाय थांबले आणि हसूही उमटले. परंतु, होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविताभाभी नेमक्या कोण? अश्लील कॉमिक कॅरॅक्टर असलेल्या सविताभाभीचा हा संदर्भ आहे का? याबाबत काही कळू शकले नाही. येणारे जाणारे थांबून हे होर्डिंग वाचत आहेत. काही अर्थ लागतो का ते पाहत आहेत आणि काही संदर्भ लागला नाही की रेंगाळून पुढे जात होते.