शिवसेनेबद्दल सोनियांना हवी 'ही' गॅरेंटी; शरद पवारही पडले गोंधळात?

शिवसेनेबद्दल सोनियांना हवी 'ही' गॅरेंटी; शरद पवारही पडले गोंधळात?

राज्यात काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणं सध्याच्या घडीला शक्य नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सुटावा यासाठी राज्यासह दिल्लीतही खलबतं सुरू आहेत. मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र अद्यापही दोन्ही पक्ष अंतिम निर्णयापर्यंत आलेले नाहीत. आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेसोबतही चर्चा केलेली आहे. मात्र या बैठकीत नक्की किमान समान कार्यक्रम ठरला की नाही, याबाबत संभ्रम आहे. राज्यात काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणं सध्याच्या घडीला शक्य नाही. त्यामुळे या सर्व चर्चेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही केंद्रस्थानी आल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय कोंडीवर दिल्लीत खलबतं झाली. मात्र कोणताही तोडगा निघाला नसल्याचं समोर आलं. मात्र सोनिया गांधी या सत्तावाटपावर नव्हे तर दुसऱ्याच मुद्द्यावर अडून बसल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विचारधारेत मोठी भिन्नता आहे. त्यामुळे आगामी काळात काही मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे या वादग्रस्त मुद्द्यांवर शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अशी सोनिया गांधी यांची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नागरिक दुरुस्ती विधेयक यांसारख्या मुद्द्यांवर शिवसेनेची काय भूमिका आहे, असा काँग्रेसचा प्रश्न आहे. या प्रश्नांवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत शरद पवार यांनी हमी द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. पण शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या भूमिकेमुळे शरद पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तापेच अजूनही सुटला नसल्याचं चित्र आहे.

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 4:31 PM IST

ताज्या बातम्या