महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत नाचक्की, 'या' कारणामुळे सोनिया गांधी नाराज

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत नाचक्की, 'या' कारणामुळे सोनिया गांधी नाराज

सत्तेवरुन शिवसेना-भाजपमध्ये घमासान सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीत चर्चा करण्यासाठी गेलेल्या नेत्यांवर सोनिया गांधी नाराज आहेत.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी) नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर: सोनिया गांधींशी चर्चा करायला गेलेल्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांवर नामुष्कीची वेळ ओढवली. शुक्रवारी सकाळी सोनिया गांधींनी भेटीसाठी वेळ नाकारली, आणि सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याकडे पाठवलं. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना चांगलच फैलावरच घेतलं.

राज्यात सत्तास्थापनेचा डाव रंगलेला असताना काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालं. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे यांनी सोनियांच्या भेटीची वेळ मागितली खरी, पण त्यांच्या पदरी निराशाच आली. सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना सरचिटणीस वेणुगोपाल यांची भेट घेण्याचा आदेश दिला. शिवसेनेसोबत जाणार नाही असे स्पष्ट संकेतच सोनिया गांधींना द्यायचा होता, असं सांगितलं जातं आहे. संध्याकाळी काँग्रेस नेते पुन्हा सोनियांच्या निवासस्थानी दाखल झाले.

दिल्लीतील भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

वेणुगोपाल यांनी सर्व काँग्रेस नेत्यांची खरडपट्टी काढल्याचंही सांगितलं जात आहे. शिवसेनेसोबात जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिर, कलम 370, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय भूमिका घ्यावी, असे प्रश्न विचारून नेत्यांना निरुत्तर केलं. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यानं सेनेसोबत जाऊ शकत नाही, असं वेणुगोपाल यांनी बजावलं.

सेनेसोबत जाणार नाही, विरोधातच बसणार, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निकालाच्या दिवशीच जाहीर करून टाकलं. शिवाय काँग्रेसमधला एक मोठा गटही सेनेसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट असताना काही काँग्रेस नेते सेनेसोबत जाण्याची भाषा करत होते. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण एक.

अखेर पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहाखातर काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं खरं पण त्यांना सोनिया गांधींच्या रोषाचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांच्यासारख्या मुलूख मैदानी तोफेचा फायदा होण्याची शक्यता असतानाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मनसेला सोबत घेणं टाळलं. त्यामुळे विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेल्या सेनेसोबत घरोबा करण्यासाठी हायकमांड हिरवा झेंडा दाखवतील, याची तिळमात्र शक्यता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या