अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 23 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ही वंदे भारत एक्स्प्रेस नुकतीच सुरू झाली आहे. या रेल्वेला पहिल्याच महिन्या प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. अत्याधुनिक सुविधा आणि वेळेची बचत असा दुहेरी फायदा देणाऱ्या रेल्वेतून प्रवास करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. त्याचवेळी या रेल्वेला आणखी एक स्टॉप असावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
'या' गावी थांबवा वंदे भारत!
मध्य रेल्वे विभागातील दौंड हे एक मोठ्या जंक्शनपैकी एक स्टेशन आहे. महाबळेश्वर, अष्टविनायक तसंच महाराष्ट्रातील इतर शक्तीपिठांना जाण्यासाठी अनेक प्रवासी दौंड स्टेशनवर उतरतात. वंदे भारत एक्स्प्रेसचा सोलापूर ते मुंबई मार्गावर फक्त कुर्डुवाडी हा एकच स्टॉप आहे. त्यामुळे दौंडला उतरणाऱ्या प्रवाशांना 'वंदे भारत'चा फायदा होत नाही. त्यामुळे ही रेल्वे दौंडलाही थांबवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
'सोलापूरच्या प्रवाशांसाठी कुर्डुवाडी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनमध्ये 'वंदे भारत' चा स्टॉप असावा ही मागणी पूर्ण झाली आहे. पण, त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून दौंडमध्येही या गाडीचा स्टॉप असावा अशी मागणी प्रवासी संघटनांकडून आली आहे. रेल्वे प्रशासन याबाबत योग्य निर्णय घेईल, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी दिलीय.
रेल्वे विभागानं अतिशय सखोल अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. कमी वेळात होणाऱ्या प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेस ओळखली जाते. प्रवाशांची संख्या आणि 'वंदे भारत' मधील एकूण सीट्सचूी संख्या याचा विचार करून दौंड स्टेशनवरील स्टॉपबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या तरी या प्रकारची कोणतीही तरतूद रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांनी दिलं आहे.
वंदे भारतची वेळ बदलणार?
सोलापूरहून मुंबईला दुपारी 12 वाजता वंदे भारत गाडी पोहचते. त्यानंतर दुपारी चार वाजता ती पुन्हा सोलापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते. सोलापूरहून मुंबईला कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना 12 ते 4 हा खूप कमी कालावधी मुंबईत मिळतो. त्यामुळे ही गाडी उशीरा सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आलीय. प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय.
वंदे भारत निर्मितीतही 'लातूर पॅटर्न' संपूर्ण देशाची भागणार गरज, Video
'रेल्वेचे जनरल मॅनेजर मागच्या आठवड्यात सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी आम्ही प्रवाशांच्या मागण्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत. त्याप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते सोलापूर गाडीच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक डोअरमध्ये थोडे बदल करण्यात आले असून त्याबाबतची अडचण येत्या काळात दूर होईल,' अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांनी दिलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Solapur, Vande Bharat Express