मुंबई 15 ऑक्टोबर : आपण अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा ऐकत असतो. आपल्या राज्यातील काही अधिकारी असे आहेत, ज्यांच्या संघर्षाच्या कथा अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. त्यापैकी एक आयएएस रमेश घोलप आहेत. रमेश घोलप हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील महागावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील गोरख घोलप हे वाहनांचं पंक्चर काढायचे. लहानपणी रमेश यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. रमेश यांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हालाखीच्या परिस्थितीत जगत होतं. रमेश यांची आई विमलदेवी रस्त्यावर बांगड्या विकायच्या. कधी रमेश आईला मदत करायचे तर कधी वडिलांच्या कामात मदत करायचे.
प्रेरणादायी! सलून चालकाच्या पोरीची कमाल, MPSC परीक्षा पास करत बनली RTO इन्स्पेक्टर
रमेश यांचं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो आपल्या मामाच्या गावी बार्शीला गेले. रमेश यांना 12वी बोर्डाच्या परीक्षेत 88.50 टक्के गुण मिळाले होते. एज्युकेशनमध्ये डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी गावातल्याच शाळेत शिकवायला सुरुवात केली. डिप्लोमासोबतच त्यांनी बीएची डिग्रीही पूर्ण केली. त्यांच्या आईला सामूहिक कर्ज योजनेअंतर्गत गाय खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपये कर्ज मिळालं. या पैशांतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप समस्यांना सामोरं जावं लागलं. बांगड्या विकून आई आणि रमेश जे पैसे मिळवायचे, त्या पैशांनी त्यांचे वडील दारू विकत आणायचे. वडील गोरख यांच्या निधनानंतर रमेश यांच्याकडे मामाच्या गावाहून आपल्या घरी जाण्यासाठी दोन रुपयेही नव्हते. त्यावेळी दोन गावांदरम्यान धावणाऱ्या बसला पाच रुपये तिकीट आकारलं जायचं. मात्र रमेश पोलिओग्रस्त असल्याने त्यांचं तिकीट फक्त 2 रुपये होतं. पण तेवढे पैसेही त्यांच्याजवळ नव्हते.
कोल्हापूर : ग्रामीण भागातील पोरीची गगनभरारी, वर्षाला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळालं
अभ्यास सुरू ठेवत रमेश स्पर्धा परीक्षा देत होते. त्यांची मेहनत फळाला आली आणि ते यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरले. 2011 च्या UPSC परीक्षेत देशभरातून त्यांनी 287 वा क्रमांक मिळवला होता. त्याच वर्षी राज्यसेवा परीक्षेत ते राज्यातून पहिले आले. आयएएस रमेश घोलप झारखंड केडरचे अधिकारी आहेत. सध्या ते झारखंडमधील गढवाचे जिल्हाधिकारी आहेत.
गेल्या वर्षी आयएएस रमेश घोलप यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो त्यांच्या गावात काढला होता. रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीसोबत ते मनसोक्त हसताना दिसत होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना फार आवडला होता. रमेश यांच्या यशाचे साक्षीदार त्यांचे गावकरी आहेत, त्यांच्या गावातील थोरामोठ्यांना रमेश यांची यशोगाथा माहीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiring story, Success story