अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 31 मार्च : खरं तर शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता जोडव्यवसाय करणे काळाची गरज ठरते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील हणमंत धोंडिबा कांबळे यांनी हे जाणले, शेतीला कुक्कुट पालनाची जोड दिली आणि स्वतःची प्रगती केली आहे.
कधी झाली व्यवसायाची सुरुवात?
पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेचा पंचायत समिती मोहोळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लाभ घेतला आहे. हणमंत कांबळे यांनी 2010 साली स्वक्षमतेने 200 गावरान कुक्कुट पक्षांसह संगोपन व्यवसाय सुरू केला. त्यांना पशुसंवर्धन विभागाकडून वेळीवेळी मार्गदर्शनामुळे कुक्कुट पालनाविषयी त्यांची रूची निर्माण झाली.
रेशीम शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, एका एकरात कमावतोय तब्बल 6 लाख!
हणमंत कांबळे यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांना शासनाकडील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 1 हजार मांसल कुक्कुटपक्षी या योजनेसाठी अर्ज करण्यास प्रेरित करण्यात आले. या योजनेअंतर्गत 2015 साली त्यांना 1 हजार मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी अनुदान देण्यात आले. त्यानंतर कुक्कुट पालनातून आलेल्या नफ्यातून त्यांनी त्या शेडचे विस्तारीकरण करून 8 हजार पक्षी क्षमता असणारे शेड बांधकाम पूर्ण केले.
नंतर पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाबार्डकडून अर्थसहाय्य मिळवून 12 हजार पक्षी क्षमता असणाऱ्या शेडचे विस्तारीकरण केले. त्यानंतर 2019-2020 साली त्यांना सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेची माहिती मिळाली व त्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना अनुदान देण्यात आले. त्यांनी सधन कुक्कुट विकास गट चांगल्या पध्दतीने सुरु ठेवुन त्याचेसुध्दा विस्तारीकरण केले.
Success Story : सिताफळाचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यानं शोधला नवा उद्योग,आता करतोय लाखोंची कमाई, Video
7500 दैनंदिन अंडी उत्पादन
माझ्याकडे ब्रीडर स्टॉक हे सी.पी.डी.ओ. बंगळूरूकडून प्राप्त असून सध्या 10 हजार कावेरी जातीचे पक्षी आहेत. 1 लाख 20 हजार क्षमतेचे सेटर मशीन आहे. 30 हजार क्षमतेचे हॅचर आहे. 7500 दैनंदिन अंडी उत्पादन होते. मिळणाऱ्या नफ्यातून मी स्वतःची फिड मिल सुरू केली आहे. मागील 3 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकदिवसीय 100 कुक्कुट पक्षी या योजनेतून 63 हजार, 53 हजार व 46 हजार एवढी पिल्लांची मागणी पूर्ण केली आहे.
या व्यवसायातून माझी आर्थिक उन्नती झाली असून मी माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करू शकलो. त्याला मी पोलिस उपनिरीक्षक बनवले, याचा अभिमान आहे. मी सोलापूर सोबतच आता अन्य जिल्ह्यातीलसुध्दा कुक्कुट मागणी पूर्ण करीत आहे, असं हणमंत कांबळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Solapur