सोलापूर, 6 डिसेंबर : तुम्ही कधी ऐकलंय का, दुध आणि शेण तुम्हाला करोडपती करू शकतं, तर हो. हे एका शेतकऱ्याने खरे करुन दाखवलंय. एका भल्या मोठ्या कंपनीलाही हेवा वाटेल, असा उद्योग या शेतकऱ्याने करुन दाखवलाय. दुध आणि शेणाच्या या उद्योगातून त्यांनी 1 कोटी रुपयांचा बंगलाही बांधला आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून या अशिक्षित शेतकऱ्याने अल्पावधीत आपलं वेगळं वैभव निर्माण केले आहे.
प्रकाश इमडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा बंगलाही बांधला आहे. प्रकाश इमडे हे सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील इमडेवाडी येथील आहे. जाणून घेऊया, त्यांची यशस्वी यशोगाथा.
प्रकाश इमडे यांनीनी जिद्दीने आणि प्रामाणिक कष्ट करुन दूध व्यवसाय केला आहे. त्यांनी कमी भांडवलात वर्षाला लाखो रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते, असा आदर्श निर्माण केलाय. त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू जमीन होती आणि एक गायसुद्धा होती. त्या एका गायीपासून त्यांनी 1998 मध्ये दुध व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 150 गायी आहेत. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध हे दूध डेअरीला देतात.
प्रकाश इमडे हे दूध आणि शेणातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न घेत आहेत. त्यांनी आपल्या एका गायीपासून उभारलेलं वैभव भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावते. प्रकाश इमडे यांनी ज्या गायीपासून व्यवसायाला सुरुवात केली, त्या गायीचा फोटो आज त्यांच्या देवघरात आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय इमडे कुटुंबीय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत.
एकटी सून 55 गायींच्या धारा काढते -
गेल्या 20 वर्षांपासून प्रकाश इमडे हे एक दिवसही कधी गोठा सोडून बाहेर गेले नाहीत. त्यांची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबतातात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढत असे. गोठ्यात चार मजूर कामाला आहेत. मात्र, तरीसुद्धा बापूंचे कुटुंबही या गोठ्यात राबते. त्यामुळेच वर्षाला दुधाचे लाखोंचे उत्पन्न असूनसुद्धा शेणातूनही दरवर्षी ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळवतात.
1 कोटींचा बंगला -
प्रकाश इमडे यांनी आपल्या रानात एक कोटींचा टोलेजंग बंगला उभारला आहे. या बंगल्याला नावही 'गोधन' निवास असे दिलं आहे. या घरावर या गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा आहे. त्यांच्याकडे असलेल्या चार एकर शेतीत इमडेंनी दोन एकरमध्ये मुक्त गोठा आणि आपला बंगला उभारला आहे. तर उरलेल्या दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. मूळ व्यवसाय सुरू केलेली लक्ष्मी 2006 साली गेली. यानंतर त्यांनी त्याच गायीच्या वंशावर ही वंशवेल वाढवत नेली आहे.
हेही वाचा - ग्रेटच! IIT पासआऊट, जर्मनीत इंटर्नशीप; आवडलं नाही म्हणून UPSC करत तरुणी झाली IAS
आज त्यांच्या मुक्त गोठ्यात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. त्यांच्या गोठ्यात पंजाबमध्ये गायी जितके दूध देतात तितकेच दूध देणाऱ्या गायी देखील आहेत. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशबापूंनी प्रयोग यशस्वी केला आहे. पूर्वी 25 लिटर दूध देणाऱ्या गायी 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत.
बापूंच्या गोठ्यात इतक्या गायी असून कधीही साप, नाग, विंचू , बेंडकुळ्या दिसत नाहीत. कारण प्रकाश बापूंनी शेतात तीन बदके आणून ठेवली आहेत. ती गोठा आणि शेतात सातत्याने फिरत असतात. त्यामुळे मागील 8 ते 10 वर्षात या बदकांच्या भीतीने त्यांच्या शेतात कधीही हे प्राणी दिसले नाहीत. इमडेंनी उभारलेले हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाश इमडे हे सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करतात. येथे असलेल्या गोठ्यातील गायींना रोज चार ते पाच टन हिरवा चार लागतो. तेवढाच मुरघास विकत घेतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Farmer, Solapur, Success story