'अजित पवारांवर आधी कारवाई करा, आम्ही लेचेपेचे नाहीत', मोहिते पाटील आक्रमक

'अजित पवारांवर आधी कारवाई करा, आम्ही लेचेपेचे नाहीत', मोहिते पाटील आक्रमक

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, सोलापूर, 12 जानेवारी : जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांवर कारवाई केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. 'रात्रीच्या अंधारात भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीने कारवाई करावी,' असं खुलं आव्हान मोहिते पाटलांनी दिलं आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माळशिरसमधील मोहिते पाटील गटाच्या 6 जिल्हा परिषद सदस्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आणि भाजपाच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी आली.

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गटाच्या सदस्यांनी राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचा पित्त चांगलेच खवळले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मोहिते पाटील गटाच्या सदस्यांवर राष्ट्रवादी पक्षातून निलंबित करण्याची कारवाई केलेली आहे. सोबतच सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावं अशी तक्रारही त्यांनी दाखल केलेली आहे.

फडणवीसांचा डायलॉग वापरत नारायण राणेंचा ठाकरे पिता-पुत्रावर शाब्दिक हल्ला

'राष्ट्रवादी काँग्रेसनं आमच्या सदस्यावर काय कारवाई केली, याबाबत आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र राष्ट्रवादीला कारवाई करायचीच असेल तर आधी भाजपसोबत जाऊन रात्रीच्या अंधारात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि नंतर राष्ट्रवादीने मोहिते पाटील गटाच्या सदस्यांवर कारवाई करावी,' असे खुले आव्हान विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलं आहे.

'अडीच वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय शिंदे यांना मतदान करून अध्यक्ष करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांवर तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली याचे उत्तरही राष्ट्रवादीने द्यावे. अशा कारवाईला घाबरायला आम्ही काही लेचेपेचे नाहीत,' असा टोला विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 01:52 PM IST

ताज्या बातम्या