महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, सोलापुरातील शिवसेना नेत्यांमध्ये उफाळली नाराजी

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, सोलापुरातील शिवसेना नेत्यांमध्ये उफाळली नाराजी

शिवसेना नेत्यांनी आपली तक्रार शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

  • Share this:

सोलापूर, 27 जुलै : महाविकास आघाडी सरकारमध्ये खदखद असल्याची चर्चा सातत्याने जोर धरत असतानाच त्याचा प्रत्यय सोलापूरमध्ये आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आम्हाला विश्वासात घेत नसून आम्हाला सापत्न वागणूक देत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कायमच दुय्यम वागणूक देत असून विकास कामांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे हे सरकार महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे? असा प्रश्न आम्हाला पडत असल्याची खदखद शिवसेनेचे पदाधिकारी सोमेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख वाघमोडे यांनीही याबाबत आपली तक्रार शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे शिवसेनेने देखील याची दखल घेत शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांची मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे पालक म्हणून नेमणूक केली आहे.

काय आहे राष्ट्रवादीची प्रतिक्रिया?

'महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. सुनील प्रभूंची निवड होणे म्हणजे आघाडीत खदखद आहे असे नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे आमदार सुनील प्रभूंकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संघटनात्मक पालकत्व देण्यात काहीच गैर नाही. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना भेटता येत नाही त्यामुळे त्यांना वेळ देता आला नसेल. त्यामुळे त्यांचा गैरसमजही झाला असेल मात्र आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय. भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये,' अशी सारवासारव पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवारांना भेटण्यासाठी रेस्ट हाऊसमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर यांनी पालकमंत्र्यांवर आरोप केले होते. त्यातच आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केल्यामुळे भविष्यात स्वपक्षीयांसह मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 27, 2020, 9:22 PM IST

ताज्या बातम्या