सागर सुरवसे,सोलापूर, 6 मार्च : सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार ठरवताना भाजपची चांगलीच दमछाक होत असल्याचं दिसत आहे. कारण पक्षाची धुरा दोन देशमुखांकडे असल्याने कोणाच्या समर्थकाला उमेदवारी द्यायची, याबाबत आता पक्षनेतृत्त्वही संभ्रमात आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा 2014 साली लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव करुन भाजपने धक्का दिला. त्यानंतर भाजपने सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्याला दोन मंत्रीपदे दिली. तसंच स्मार्टसिटीची घोषणा करण्यात आली.
मात्र दोन देशमुखांच्या वादामुळे लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. तरीही आम्ही एकत्र असल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंना पाडल्याचा दावा पालकमंत्री विजयकुमार देशमुख करत आहेत.
काँग्रेसकडून सुशीलकुमारच, भाजपकडून कोण?
काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास जाहीर केल्यात जमा आहे. मात्र भाजपमध्ये उमेदवारीवरुन त्रांगडं निर्माण झालं आहे. कारण एकीकडे भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे उमेदवारीसाठी बोहल्यावर तयार आहेत तर तिकडे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आणि गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनीदेखील लोकसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. आपल्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
लिंगायत समाजाचे धर्मगुरू राजकारणाच्या मैदानात?
लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंनी कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास समाजाचा विरोध आहे, असं म्हटलं जातं. समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा फायदा होण्यासाठी समाजाचा वापर करण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका लिंगायत समन्वय समितीने घेतली आहे. तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र धर्मगुरूंनी राजकारणात यावे, यासाठी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींचे समर्थन केलं आहे.
बनसोडेंचं काय होणार?
दुसरीकडे, भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमर साबळे हे उपरे आहेत तर महाराजांचा जातीचा दाखला बोगस असल्याचा दावा बनसोडे यांनी केला आहे. त्यामुळे यावेळीही मीच लोकसभेचा उमेदवार असणार, असं खासदार बनसोडे म्हणत आहेत.
इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडताना भाजपची मोठी अडचण होणार आहे.
VIDEO : अन् खळ्ळ-खट्याॅक, मनसे रणरागिणींनी लंपट व्यवस्थापकाला धु-धु धुतले