'...तर आम्ही रश्मी शुक्लांसोबत आहोत'; कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

'...तर आम्ही रश्मी शुक्लांसोबत आहोत'; कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

कॉंग्रेसच्या आमदार आणि नुतन प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांनीही या वादात उडी घेतली आहे.

  • Share this:

सोलापूर, 27 मार्च : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगत असतानाच कॉंग्रेसच्या आमदार आणि नुतन प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांनीही या वादात उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करू, अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या लीक झालेल्या अहवालाचा. त्यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी शुक्ला यांच्याविरोधात एकवटल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र रश्मी शुक्लांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस बोलून दाखवला की काय, अशी चर्चा त्यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

हेही वाचा - होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यातील जनतेला खास आवाहन

'सोनिया गांधी याच UPAच्या अध्यक्षा'

UPAच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी UPAचे नेतृत्व शरद पवारांकडे द्यावे असे विधान केले होते. त्यानंतर मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांची संजय राऊतांसोबतच शरद पवारांना खोचक टोला लगावला. त्यावरुनच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार हे राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत असा सवाल केला होता. त्याबाबत विचारले असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राऊतांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

'महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार नाही'

राज्यातील लॉकडाऊनबाबत विचारले असता प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन होऊ देखील नये. लॉकडाऊनची झळ गरीबांना जास्त बसते. मास्कचा वापर केला तर परिस्थिती टाळता येऊ शकते. लॉकडाऊन होऊ नये या मताची मी आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

Published by: Akshay Shitole
First published: March 28, 2021, 12:13 AM IST

ताज्या बातम्या