राष्ट्रवादीला धक्का, मोहिते पाटील समर्थकांनी असा काही युक्तिवाद केला की कोर्टाने स्थगितीच दिली!

राष्ट्रवादीला धक्का, मोहिते पाटील समर्थकांनी असा काही युक्तिवाद केला की कोर्टाने स्थगितीच दिली!

मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद करताच न्यायालयाने सदर अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती दिली आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 29 जानेवारी : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये पक्ष म्हणून मान्यताच नाही. मग हे राष्ट्रवादीचे नेते माळशिरसच्या सहा सदस्यांविरूध्द व्हिप कसा काढू शकतात? अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी कशी करू शकतात? असा युक्तीवाद मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने सदर अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या 6 सदस्यांनी ऐनवेळी भाजपा आणि समविचारी गटाला मतदान केल्यामुळे शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे जि.प.चे अध्यक्ष बनले. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी सदर सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी व्हिप बजावला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. या मागणी विरोधात या सहा सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केली होती.

मोर्चा महम्मद अली रोडवरूनच नेणार, मनसेच्या भूमिकेमुळे पेच वाढणार

मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांनी याप्रकरणी जो युक्तीवाद केला तो पाहुन उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देत जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत आजपर्यंत राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आला नाही. राष्ट्रवादी पक्षाची जिल्हा परिषद पार्टी म्हणून नोंदणीदेखील पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे घड्याळ या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या गटाचे जिल्हा परिषदेत पार्टीत अद्याप रूपांतर झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने काढलेला व्हिप हा केवळ पक्षादेशाचा आभास आहे.

कायद्यानुसार ज्याला राष्ट्रवादी पक्ष म्हणून जिल्हा परिषद कारभारात ओळखले जाते, तो राजकीय पक्ष नसून केवळ घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा गट आहे. त्या गटाच्या कार्यपध्दतीची कोणतीच नियमावली आणि अधिकार कक्षा दर्शवणारी घटना अस्तित्वात नाही. त्यानुसार व्हीप हा नोंदणीकृत पक्षाने काढायचा असतो. पण, पक्ष अस्तित्वात आला नसताना व्हीप काढला अशी बतावणी करून व अपात्रता कारवाई सुरू करणे हा कायद्याचा दुरूपयोग आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस

अशा परिस्थितीत अस्तित्वात नसलेल्या जिल्हा परिषद पार्टीच्या पक्षादेशाचे उल्लंघन केले असा आरोप जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरून, लोकप्रतिनिधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई अकारण सुरू केली आहे. त्यामुळे कारवाई रद्द करण्याची मागणी मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी न्यायालयात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेत नोंदणी पूर्ण झाली असल्यास तसे पुरावे म्हणून प्रसिध्द करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाचे राज्यपत्र न्यायालयात हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

First published: January 29, 2020, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading