सोलापूर, 13 मार्च : सोलापूर जिल्ह्यात शिवसनेतील (Shivsena) अंतर्गत धुसफूस आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळत आहे. कारण आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी आपल्याचे पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील (Solapur Municipal Corporation) नगरसेवक मनोज शेजवाल यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तब्बल 5 कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या घटनेमुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन सभापती निवडीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यावेळी प्रभारी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती.
'आजपर्यंत बरडे यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून शिवसेनेचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला आहे. बरडे हे पक्ष संपवायला निघाले आहेत. त्यांच्याविषयी मातोश्रीवर गाऱ्हाणं मांडलं जाईल,' असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांनी दिला होता. त्यामुळे मनोज शेजवाल यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी मात्र थेट सोलापूर येथील मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या कोर्ट नं 1 यांच्याकडे दावा दाखल केला आहे. नगरसेवक मनोज शेजवाल यांनी मानहानी केल्याचा आरोप करत पुरूषोत्तम बरडे यांनी तब्बल 5 कोटी रूपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
काय आहे अब्रुनुकसानीचा दावा?
पुरूषोत्तम बरडे यांनी आपल्या दाव्यात सांगितले आहे की, नगरसेवक मनोज शेजवाल हे शिवसेना पक्षाचे नगरसेवक असून मोहोळ विधानसेभा मतदारसंघातून सन 2019 मध्ये शिवसेना पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. शेजवाल यांच्यावर कुंटणखाना (वेश्या व्यवसाय) चालवत असल्याबद्दलचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. शेजवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्याविरोधात अनेक खोटेनाटे आरोप केले आहेत. विविध दैनिकांत तसेच वृत्तवाहिन्यांवर माझ्याविरूद्ध बदनामीकारक आरोप प्रसिद्ध झाले आहेत.
हेही वाचा - अधिवेशन गाजवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी
त्यामुळे माझी बदनामी होऊन माझी राजकीय कारकीर्द धोक्यात यावी तसेच माझा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील व पक्षातील वरीष्ठ नेत्यांचा विश्वास संपावा या हेतूने केवळ मानहानी व बदनामी केली आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला असून नगरसेवक मनोज शेजवाल याला कडक शासन किंवा शिक्षा होणे गरजेचे असल्याचेही जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदावरून सुरू झालेले हे आरोप-प्रत्यारोप सत्र अखेर कोर्टात पोहोचले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या संघर्षाचा शेवट कसा करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news