प्रदीप भाणगे (प्रतिनिधी),
कल्याण, 7 जून- बँकेत भरण्यासाठी नेली जात असलेली पेट्रोलपंपाची रोकड लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकत गुन्ह्याचा छडा लावला आहे.
कल्याणच्या प्रेम ऑटो पेट्रोलपंपाची 12 लाख 60 हजार रुपयांची ही रोकड 31 मे रोजी बँकेत भरण्यासाठी नेली जात होती. यावेळी रोशन पेट्रोलपंपासमोर अज्ञात चोरट्यांनी पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण करत ही रोकड लुटून नेली होती.चहावाल्याने दिलेल्या 'टीप'वरून चोरट्यांनी ही रक्कम लुटल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन शिरोडकर याच्यासह सोमनाथ खंडागळे, नितीन पवार, रुपेश म्हात्रे, रोहिदास सुरवसे आणि वैभव भास्कर या 6 जणांना अटक केली. यापैकी सचिन शिरोडकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत. आरोपी वैभव भास्कर हा चहाविक्रेता असून त्यानेच दररोज पेट्रोलपंपाची रोकड नेली जात असल्याची माहिती सचिनला दिली होती. त्यानंतर ही चोरी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्वांकडून पोलिसांनी 11 लाख 70 हजार रुपये जप्त केले असून त्यांना कोर्टाने 9 जूनपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
VIDEO:आयारामांची आमच्याकडे लाईन, गिरीश महाजनांचा चव्हाणांवर पलटवार