मुंबई, 25 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित होऊन बांगलादेश किनारपट्टीकडे सरकले. या चक्रीवादळामुळे बांग्लादेशमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली. थायलंडने या चक्रीवादळाला 'सितरंग' असे नाव दिले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सितरंग चक्रीवादळाचा परिणाम आता दिसून येत आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले. बांगलादेशात सितरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू झाला. बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यातील पाच जणांचा या चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्यू झाला आहे, असे आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने म्हटले आहे.
वादळाचे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
तसेच याबरोबरच IMD ने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बंगालचा गंगेचा मैदान, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांशिवाय कोकण, कर्नाटक, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, कर्नाटक आणि केरळ, लक्षद्वीपमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - Cyclone Sitrang : बांग्लादेशमध्ये 'सितरंग' चक्रीवादळाचा कहर, 5 जणांचा मृत्यू; भारतालाही पावसाचा फटका
ढाक्यात पाऊस -
चक्रीवादळ सितरंगमुळे दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीच दिसून येत आहे, तर ढाकासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये संततधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या अहवालात, पायरा, मोंगला आणि चितगाव बंदरांना धोक्याचे सिग्नल वाढवण्यास सांगितले आणि कॉक्स बाजार बंदरांना 10 च्या प्रमाणात धोक्याचा सिग्नल क्रमांक 6 कायम ठेवण्याचा सल्ला दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, IMD FORECAST, Maharashtra News