सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 18 डिसेंबर : खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती अशीच घटना बीडमध्ये घडली आहे. बहिणीनं प्रेम विवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला. इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटार सायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. तर भाग्यश्री जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
दोन महिन्यापूर्वी सुमित आणि भाग्यश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र भाग्यश्रीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. यात बालाजी आणि सुमित याचं अगोदर भांडणही झालं होतं. याचाच राग मनात धरून परिक्षेसाठी आलेल्या सुमितवर बालाजीने कॉलेजच्या गेटवरच धारधार शस्त्रानं हल्ला केला. यात जखमी झालेल्या सुमितचा जागेवरच मृत्यू झाला.
इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्यासाठी माजलगाव तालुक्यातील तालखेडवरून सुमित बीडमध्ये आला होता. सुमित हा शहरातील नागोबा गल्लीत मामाकडे राहता होता. याच दरम्यान त्यांचे भाग्यश्री सोबत प्रेमसंबंध जुळले. घरच्यांना विचारून लग्नाला परवानगी मागितली मात्र न मिळाल्यानं पळून जावून दीड महिन्यापूर्वी लग्न केलं होतं. यांचा राग मनात धरून भाग्यश्रीच्या भावानेच सुमितचा खून केला.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुमितच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
===================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.