अयोध्येत बुद्धविहार निर्माण करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांनी लढा देणं गरजेचं : आनंद शिंदे

अयोध्येत बुद्धविहार निर्माण करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांनी लढा देणं गरजेचं : आनंद शिंदे

सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे असल्याचं आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, पुणे, 30 जुलै : आयोध्येत सापडलेल्या बौद्धकालीन अवशेषांचे जतन करण्यात यावे व त्यासाठी एक बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, नेत्यांनी एकत्र यावे, असं आवाहन गायक आनंद शिंदे यांनी केलं आहे.

अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनी सुद्धा केला आहे. त्यामुळे अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे असल्याचं आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

'राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे. देशातील अनेक बडे आंबेडकरी नेते हे वेगवेगळ्या पक्ष,संघटना यामध्ये विभागले आहेत. परंतु अशा वेळी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन आयोध्येत एक उत्कृष्ट बुध्दविहार व बौद्ध अवशेष, मुर्त्यांचे जतन करण्यासाठी संग्राहलय उभे करावे अशी प्रमुख मागणी घेऊन सर्व आंबेडकरी नेत्यांनी, भिमबांधवांनी व्यापक लढा उभा करुन आपला अधिकार मिळवला पाहिजे,' असंही आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवलेंनीही जाहीर केली भूमिका

'भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मस्जिद उभारण्याआधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर मस्जिदचा वाद कायमचा मिटला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे. तसंच मस्जिदलाही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे,' अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2020, 11:29 PM IST

ताज्या बातम्या