विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 20 मार्च : समुद्र किनाऱ्यावर अनेकदा दुर्मिळ प्रजातीचे मासे आढळून येतात. या माशांना स्थानिक मच्छीमारांकडून नेहमीच अभय दिलं जातं. जाळ्यात अडकलेल्या माशांना देखील हे मच्छिमार पुन्हा पाण्यात सोडून देतात. अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तळाशील समुद्र किनारी घडली. मालवण तळाशील समुद्र किनारी घायाळ स्थितीत आढळलेल्या डॉल्फिन सदृश माशाला स्थानिक मच्छीमारांनी जीवदान दिलं आहे. याचा व्हिडीओ देखील आता समोर आला असून मच्छिमारांचे कौतुक सर्वजण करत आहेत.
दुर्मिळ माशाला जीवनदान
डॉल्फिन सारखा दिसणारा फिनलेस पॉरपॉईज प्रजातीतील एक मासा मालवण तळाशील समुद्रकिनारी घायाळ अवस्थेत मच्छीमारांना दिसून आला. चार ते पाच फूट लांबीच्या या माशाला जोरदार लाटांपुढे टिकाव धरता येत नव्हता. स्थानिक मच्छीमारांनी प्रथम या माशाला समुद्रात सोडले. मात्र, काही काळ पाण्यात संचार केल्यानंतर पुन्हा तो किनाऱ्यावर वाहून आला. लाटांचा जोर असल्यामुळे घायाळ माशाला खोल पाण्यात जाण्यात अडचण येत होती. अखेर मच्छीमारांनी तुलनेने संथ प्रवाह असलेल्या तळाशील खाडीत त्याला सोडले. डॉल्फिन प्रमाणे दिसणाऱ्या या सागरी जीवाला स्थानिक मच्छीमार बुलीया आणि हडसरी असे म्हणतात. त्याच्या तोंडाकडील भागाच्या आकारावरून त्याला समुद्री डुक्कर असेही संबोधले जाते. मच्छीमारांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग : डॉल्फिन सदृश माशाला स्थानिक मच्छीमारांकडून जीवदान#sindhudurg #dolphin pic.twitter.com/bcIYt4TiNL
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2023
पर्यटनप्रेमींकडूनही आवाहन
डॉल्फिन माशांमुळे कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत आहे. डॉल्फिन पाहण्यासाठी अनेक अभ्यासक, संशोधक आणि पर्यटनप्रेमी नेहमीच कोकण किनारपट्टीवर फेरफटका मारत असतात. डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी, ते जखमी होऊ नये यासाठीही पर्यटनप्रेमींकडून नेहमीच आवाहन केले जाते. काही दिवसांपूर्वी मच्छिमार करणाऱ्यांनीही डॉल्फिनच दिसताच त्यांनी मासेमारीसाठी सोडण्याते आलेले जाळे काढून घेऊन डॉल्फिन माशांना एक प्रकारचे जीवदानच दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sindhudurg