बीड, 18 ऑगस्ट : बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी या 5 शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अॅन्टिजन तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती रोज मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात येत असतात (सुपर स्प्रेडर्स ) यांची तपासणी केली जात आहे. या 5 शहरांतील सर्व प्रकारची सर्व दुकाने दि.18, 19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी बंद राहणार आहेत.
सध्या शहरातील वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे आणि त्यातून अनेक संसर्ग झालेले रुग्ण संसर्गाचे गंभीर परिणाम होण्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आणि पर्यायाने होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी करण्यात खूप मदत होत आहे. त्यामुळे केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी या शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने ही मोहिम राबविण्यात येत आहे
सदर सर्व नियोजन दुकानदार, पेट्रोल पंप चालक व बँकांच्या मदतीनेच करण्यात आले आहे. शहरातील दूध विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता निरिक्षकांद्वारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जायचे आहे आणि शहराबाहेरून येणाऱ्या दूध विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गांवच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी शहरातच करण्यात येणार आहे.
या नोंदणीनुसार प्रत्येकाला एक स्थळ आणि वेळ प्रतिनिधींमार्फत कळविण्यात येत असून बरोबर त्याच वेळी प्रत्येक दुकानदाराने तपासणी साठी यावे असे कळविले जाणार आहे या मोहिमेत 5 शहरांतील सर्व प्रकारच्या व्यावसायिक- दुकानदारांची जसे किराणा, कपडे, सराफा, किराणा रिटेल होलसेल, आडत ,सिड्स अँड फर्टिलायझर्स ,परमिट व दारु दुकाने ,मेडिकल, जनरल स्टोअर्स, नाभिक ,फोटो स्टुडिओ, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यासह सर्व प्रकारच्या विविध व्यवसायिकांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Coronavirus