रवी शिंदे/भिवंडी, 11 ऑगस्ट : कोरोना संकटात खासगी रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आला जीव गमवावा लागल्याचे वृत्त यापूर्वीही समोर आले आहे. यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्याचे सक्त निर्देश दिले. मात्र राज्य शासनाच्या या निर्देशांकडे खासगी रुग्णालये आजही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र भिवंडीत समोर आले आहे. खासगी रुग्णालयांच्या या मनमानी कारभारामुळे भिवंडीतील दोन बालकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.
शुक्रवारी ( 7 ऑगस्ट ) रोजी शहरातील कल्याणरोड येथील अफसरा टॉकीज परिसरात असलेल्या फिजा बेकरी येथे राहणाऱ्या जमशेद अंसारी यांचा 14 महिन्यांचा मुलगा हाशिर हा पाण्याच्या टब मध्ये पडल्याने त्याला दुखापत झाली होती . तर याच दिवशी याच परिसरात राहणारे गौस शेख यांचा 3 महिन्यांचा मुलगा सैफ याची मालिश करीत असताना त्याने उलटी केली होती. 14 महिन्यांच्या हाशिर व अवघ्या 3 महिन्यांचा सैफ या दोघांनाही त्यांच्या पालकांनी शहरातील विविध आठ खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरवले. मात्र एकाही खासगी रुग्णालयाने या मुलांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. यादरम्यान काही खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याचे कारण दिले तर काहींनी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याचे कारण दिले. शेवटी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजविण्यात या दोन्ही परिवारांचा वेळ गेला . त्यानंतर रात्री 12 वाजे दरम्यान या दोन्ही बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी धामणकर नाका येथे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या ऑरेंज या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले.
हे वाचा-कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
खासगी रूग्णालयांचे उंबरठे झिजविल्याने आपल्या मुलांचा जीव गेल्याची भावना या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या आठही रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत बालकांच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महामारीच्या संकटात रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश असूनही खासगी रुग्णालयांना या बालकांवर उपचार केले नाही ही गंभीर बाब असून महापालिकेने या आठही रुग्णालयांवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भिवंडी शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.