धक्कादायक : पाकिस्तानच्या हेरगिरीचे नाशिक कनेक्शन समोर, पोलिसांनी केली आरोपीला अटक

धक्कादायक : पाकिस्तानच्या हेरगिरीचे नाशिक कनेक्शन समोर, पोलिसांनी केली आरोपीला अटक

याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय संजीव कुमार या बिहारी युवकाला अटक केली आहे.

  • Share this:

नाशिक, 3 ऑक्टोबर : नाशिकमधील अर्टलरी परिसरात हेरगिरी देवळाली कॅम्पमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका युकाने सैनिकी हॉस्पिटल परिसराचे फोटो व्हिडीओ पाकिस्तानमधील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय संजीव कुमार या बिहारी युवकाला अटक केली आहे.

भारत आणि चीन दरम्यानचे संबंध तणावपूर्ण असतानाच पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारतात हेरगिरी सुरू ठेवली आहे. या हेरगिरीचे नाशिक कनेक्शनही शनिवारी पुढे आले. देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

या युवकाला हेरगिरीच्या आरोपाखाली देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. संजीव कुमार हा 21 वर्षीय मुलगा महिनाभरापासून लष्करी भागात एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करत होता. शनिवारी सकाळी गेटवरील लष्करी जवानांनी या मुलाची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागातील फोटो पाकिस्तानातील मोबाईल व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे आढळून आलं.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या व्यक्तीची सखोल चौकशी करत असून, लष्करी विभागाचा फोटो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर पाठवणे हा हेरगिरीचा प्रकार असल्याची शक्यता आहे. या मुलाला अटक करण्यात आली असून, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सह सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. मोरे, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख अधिक चौकशी करत आहेत.बं

लष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही मोबाईलचा वापर होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. आर्टीलरी सेंटरमध्ये तोफ प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे लष्करी हद्दीतून पाकिस्तानात हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाकिस्तानकडून हेरगिरीसाठी कुमारला नियुक्त केले गेले की काय, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

यापूर्वीदेखील नाशिकमध्ये 2009 सालात पोलिस प्रबोधिनीसह रेल्वेस्थानक, आर्टिलरी सेंटरसह गर्दीच्या ठिकाणी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बिलाल शेख ऊर्फ लालबाबा याला सातपूरमधील शिवाजीनगर येथून अटक केली होती. मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अतिरेकी अबू जुंदल याने मुंबईनंतर नाशिक हे अतिरेक्यांचे लक्ष्य होते, याची कबुली दिली होती.

Published by: Akshay Shitole
First published: October 3, 2020, 11:57 PM IST

ताज्या बातम्या