पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश माने यांच्याकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 2 जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार एका 55 वर्षीय नागरिकाने केली आहे. त्यानंतर संबधित नागरिकाला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश माने यांच्याकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव अरुण गोसावी असं असून पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचं गोसावी यांचं म्हणणं आहे.

अरुण गोसावी यांच्या मुलीने रविवारी पिझ्झा मागवला होता. मात्र, घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्त असल्याने डिलीव्हरी बॉयला आत येण्यास पोलीस परवानगी दिली नाही. त्यावेळी गोसावी गेटवर गेले आणि तिथे बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा किरकोळ वाद झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गोसावी पिझ्झा घेऊन घरी आले.

परंतु, रात्री नऊच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे हे त्यांच्या एक कर्मचाऱ्यासोबत आले आणि आपल्याला गेटवर जायचं आहे असं सांगून त्यांनी मला घरा बाहेर काढले आणि गेटवर आणताच काहीही न सांगता काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कारण विचारलं तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.आणि दुसऱ्यानेही आपल्याला अशीच मारहाण केली, अशी तक्रार अरुण गोसावी यांनी केली आहे.

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र नागरिकाला झालेली मारहाण एवढी गंभीर होती की त्या मारहाणीचे व्रण अजूनही या व्यक्तीच्या अंगावर आहेत, जे बघून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकू शकतो.

आता या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. तेव्हा ते अशा पद्धतीने कायदा हातात घेणाऱ्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात की त्यांना पाठीशी घालतात, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, याप्रकरणात ज्यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, त्या पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे यांची बाजू समोर आलेली नाही. उबाळे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट केली जाईल.

First published: June 2, 2020, 9:42 PM IST

ताज्या बातम्या