मुंबई, 23 जानेवारी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानभवनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, पण ते या कार्यक्रमाला आले नाहीत.
एकीकडे विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम सुरू असताना मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसंच संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित आहेत.
या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी पुढच्या राजकारणचे संकेत दिले आहेत. 'महाविकासआघाडी सरकारला तीन चाकी रिक्षा सरकार म्हणून म्हणलं गेलं. आज वंचितचं चौथं चाक जोडलं गेलं, आणखी दोन स्टेपनीही तयार आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता दोन स्टेपनी म्हणजे कोणते दोन पक्ष? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
'दगडाने बाळासाहेबांची साथ सोडली आणि बुडाला. आम्ही देखील दगड आहोत, बाळासाहेबांनी शेंदूर फासून शिवसैनिक बनवले. हे मूर्ती चोर स्मगलिंग करतात. पावसाळ्यात गांडुळे दिसतात, त्यांचे अस्तित्व राहत नाही,' अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाओसला गेले, तुम्हाला आम्हाला दापोली माहिती, तेव्हा एकनाथ शिंदे लक्झेमबर्गच्या पंतप्रधानांना भेटले. आमच्या पक्षात या खोके देण्याची ऑफर दिली. मोदींची माणसं आहोत म्हणून सेल्फी काढला,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
'शिवसेना एकच आणि अखंड शिवसेना मिटवण्यासाठी कारस्थान सुरू आहे. मला भीती वाटत होती, पक्षप्रमुख पदाची मुदत संपतेय, उद्धव ठाकरे हे सदैव पक्षप्रमुख राहतील. सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग ही कागदी लढाई, आपण कागदी वाघ नाही,' असं राऊत कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
'शिवसेना रक्तातून निर्माण झाली आहे, नवीन मोदी सेनेने महाराष्ट्राच्या सीमा पार करून वास्तव बघावं. काश्मीर पंडीत 6 महिने धरणं आंदोलन करत आहेत, ते सुरक्षित नाहीत. काश्मीर पंडितांना टार्गेट केलं जात आहे. हिंदुत्ववादी केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे,' असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला.
जम्मूच्या रस्त्यावर बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही काश्मीरी पंडितांची मुलं मुंबई-पुण्यात शिकायला आलो, त्यामुळे आम्ही मराठी भाषा शिकलो, असं तिथले तरुण म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Shivsena