मुंबई, 21 जून : शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
शिवसेनेच्या आज होणाऱ्या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेनंही त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीतही त्याचदृष्टीने अजेंडा ठरवला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदावरून युतीत कलगीतुरा
'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली. पण उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपने धक्का दिला. कारण भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.
'देवेंद्र फडणवीस यांना सर्वांचा पाठिंबा आहे आणि भविष्यातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,' असा दावा भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. भाजपच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या 'समसमान'च्या भूमिकेला चांगलाच धक्का बसला.
दरम्यान, शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. 'आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
VIDEO : लहान मुलाने बँकेतून अडीच लाख रुपये आरामात लुटले