मुंबई, 25 मे : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता 16 आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आलं आहे. याचाच पाठपुरावा करत गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली, त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय, त्यामुळे निकालापूर्वी सुप्रीम कोर्टात धावाधाव करणाऱ्या ठाकरे गटानं आता विधानसभा अध्यक्षांकडे याचा पाठपुरावात सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. याबाबतचा निकाल लवकरात लवकर देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली.
यापूर्वी विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्यामुळे ठाकरेंच्या पक्षानं विधानसभा उपाध्यक्षांना याबाबतचं निवेदन दिलं होतं. आता विधानसभा अध्यक्ष मुंबईत परतल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे विधान सभा गटनेते अजय चौधरी, आमदार अनिल परब, विलास पोतनीस, रविंद्र वायकर आणि रमेश कोरगावकर यांनी नार्वेकरांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयाची अंमलबजावणीची मागणी केली.
खरंतर राहुल नार्वेकरांनी बुधवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांचीही भेट घेतली आहे, तसंच महाधिवक्ता तुषार मेहतांचीही राहुल नार्वेकर यांनी भेट घेतली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच नार्वेकरांनी दिल्लीत या भेटीगाठी घेतल्यानं 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. आता ठाकरे गटाच्या भेटीनंतरही नार्वेकरांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्व कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय.
कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. हे देताना कोर्टानं कालावधी ठरवून दिलेला नाही, त्यामुळे आता अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका केव्हा आणि काय निर्णय घेतात? याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचंही लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackeray