काँग्रेसच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेची खोचक टीका, महाविकास आघाडीत जुंपणार?

काँग्रेसच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेची खोचक टीका, महाविकास आघाडीत जुंपणार?

'मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून देशाची किंवा जनतेची सेवा करता येते असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही.'

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ऐतिहासिक आघाडीची स्थापना केली. या महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकारही स्थापन केलं आहे. मात्र पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या तीन पक्षांना सरकार टिकवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून नेत्यांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. अशातच आज 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं थेट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाच लक्ष्य केलं आहे.

'महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत अशी अपेक्षा आहे. मुरलेला मोरंबा व लोणची जेवणात बरी, म्हातारे नवरेही गमतीलाच बरे अशी लोकभावना आहे, पण तरुणांसाठी खुर्च्या सोडायला जुने तयार नाहीत. आपण नसलो तर महाराष्ट्राचे किंवा सरकारचे अडेल या भ्रमातून या महामंडळींनी बाहेर पडले पाहिजे. श्री. फडणवीस गेले. त्यांच्यामुळेही ना राज्याचे अडले ना मंत्रालयाचे अडले. जगरहाटी सुरूच असते. सरकारमधील इतर खातीही महत्त्वाचीच असतात, पण ‘मलईदार’ किंवा ‘वजनदार’ खाती हवीत अशी एक भावना काही वर्षांपासून बळावत चालली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे. मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून देशाची किंवा जनतेची सेवा करता येते असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

'कसरतच करावी लागेल...'

'काँगेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळात येऊ इच्छितात. आता माजी मुख्यमंत्री जेव्हा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतात तेव्हा त्यांना तोलामोलाची खाती कोणती द्यावीत? हा प्रश्नच आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना विस्तारात व खातेवाटपात सामावून घेताना कसरतच करावी लागेल,' असं म्हणत 'सामना'तून खातेवाटपातील आव्हानाबाबत भाष्य करण्यात आलं आहे.  'राष्ट्रवादीकडे अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, डॉ. शिंगणे, नवाब मलिक, माणिक कोकाटे असे भारी लोक रांगेत उभे आहेत. शिवसेनेलाही जुनेजाणते व नवे तडफदार यातून मोहरे निवडावे लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत,' अशी अपेक्षाची सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.

'पत्ते नव्याने पिसले जातील'

अधिवेशानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. 'गृह आणि नगर विकास ही दोन्ही खाती शिवसेनेकडे असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती स्वतःकडे ठेवली नाहीत याचे आश्चर्य वाटते. गृहखाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात व त्या खात्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वजन वाढते असे संकेत आहेत व त्यासाठीच शरद पवार यांच्याकडे आग्रह करून गृहखाते मागून घेतले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण आता मुख्यमंत्र्यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले नाही याचे आश्चर्य वाटते. मंत्रिमंडळ विस्तार नागपूरच्या अधिवेशनानंतर होईल व त्या वेळी खातेवाटपाचे पत्ते नव्याने पिसले जातील,' असं अग्रलेखात म्हटलं आहे.

फडणवीसांवर निशाणा

'गृह, नगर विकास, बांधकाम, पाटबंधाऱयांवर जीवनाचे सार आहे व त्यासाठीच सगळा झगडा सुरू असेल तर लोकसेवा, राज्याचे हित या शब्दांची व्याख्या बदलावी लागेल. आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास केला. बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, पण अनेकांच्या तिजोरीचे खड्डे बुजवले अशी बाहेर चर्चा आहे. गृहखाते तर नोकरासारखे व पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वापरले. काही अधिकारी तर सत्ताधारी पक्षाच्या सतरंज्या झटकत होते,' अशी टीका शिवसेनेनं आधीच्या सरकारवर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या