'भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या', शिवसेनेचा घणाघात

'भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या', शिवसेनेचा घणाघात

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : बेळगावमधील कन्नड संघटनेच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा वाट पेटला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं आता भाजपला लक्ष्य केलं आहे. 'एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच,' असं आव्हान देत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

'भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत? ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व?' असा सवाल भाजपला विचारण्यात आला आहे.

भाजपसह कानडी संघटनेचा समाचार, काय आहे 'सामना'चा अग्रलेख?

"महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळींवरील अन्याय-अत्याचार काही थांबत नाहीत. उलट सत्ताधाऱयांत अत्याचार करण्याची चढाओढच लागलेली असते. आताही कोणी एक भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे. त्याने बेळगावात येऊन सांगितले की, ‘सीमा प्रश्नावरून गेली 60 वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबवून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.’ मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या 60 वर्षांपासून सुरूच आहेत. त्या सर्व अघोरी प्रयोगांना सीमा भागातील जनता पुरून उरल्याने आता त्यांना गोळय़ा घालण्याची मागणी सुरू झाली आहे. गेल्या 60 वर्षांपासून सीमा भागातील मराठी माणूस कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाठ्याकाठ्याच खात आहे. पण सीमालढा काही थांबला नाही, कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे. भाजप पुढाऱयांच्या तोंडी सध्या ऊठसूट गोळ्या घालण्याची भाषा वाढली आहे. हे त्यांचे वैफल्य आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱया लोकांना गोळय़ा घातल्या पाहिजेत असे बजावले. अंगडी हेसुद्धा बेळगावचेच आहेत. भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱयांना बंदुकीच्या गोळय़ा मिळतात हे आता पक्के झाले. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळय़ा घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत? ते हिंदूच आहेत. बेळगावातील हिंदूंना गोळय़ा घाला असेच या लोकांना सांगायचे आहे. बेळगाव, कारवार, भालकी, निपाणीमधल्या मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा हा लढा आजचा नाही. तो साठ वर्षांहून जास्त जुना आहे. हे लढे चिरडले, रक्तपात केला. सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून नव्या लढय़ाची प्रेरणा मराठी बांधवांना मिळाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व तेही उद्धव ठाकरे आहेत. सीमा प्रश्नासाठी 69 हुतात्म्यांचे बलिदान देणारा पक्ष राज्यात सत्तेवर आहे व काँगेस-राष्ट्रवादीचे नेते सीमाप्रश्नी शिवसेनेच्या सोबतीला आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळय़ा घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सीमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर येणाऱयांचा कसा फडशा पाडतात ते समजेल. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी समन्वय मंत्री नेमले आहेत व हे मंत्री मागच्या भाजप सरकारने नेमले तसे नाहीत. सीमा आंदोलनात, बेळगावात जाऊन ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या व बेळगावी पोलिसांचा अघोरी पाहुणचार सोसला असे छगन भुजबळ व एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सीमाप्रश्नी तेथील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी नेमले आहेत. बेळगाव-कारवारचा लचका महाराष्ट्राच्या द्वेष्टेपणातून तोडला. हा अन्याय होता. अन्यायाविरुद्ध तेव्हापासून पेटलेली संतापाची ज्वाला साठ वर्षांनंतरही विझलेली नाही. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!’ अशा घोषणा देत बेळगावातील मराठी तरुणांची गरम रक्ताची पिढी रस्त्यावर उतरते. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले जाते. खोटय़ा गुन्हय़ांखाली अडकवले जाते. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? आता गोळय़ा घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच!"

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading