शिवसेनेचा देशातील मुस्लिमांना सल्ला, राहुल गांधींचा दाखला देत ओवेसींना फटकारले

शिवसेनेचा देशातील मुस्लिमांना सल्ला, राहुल गांधींचा दाखला देत ओवेसींना फटकारले

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून देशातील मुस्लिमांना एक सल्ला देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : ऐतिहासिक अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. रामलल्ला न्यासाच्या बाजूने निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा हक्क नसल्याचं नमूद केलं. तसेच मुस्लिमांना पर्यायी 5 एकर जमीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यावर मुस्लीम पक्षकारांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी या निर्णयाचे स्वागतही केलं.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून देशातील मुस्लिमांना एक सल्ला देण्यात आला आहे. अयोध्येत देण्यात येणाऱ्या 5 एकर जमिनीवर मशिद बांधण्यात येणार आहे. त्या मशिदीला बाबरचे नाव न देता एखाद्या मुस्लीम संताचे किंवा नेत्याचं नाव द्यावं असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतुकही करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचं स्वागत केलं. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर करू असं राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यांची ही प्रतिक्रिया समंजसपणा असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

अयोध्या निकालावर एमआयआम नेते ओवेसी यांनी पाच एकर जमिनीची खैरात नको अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा समाचार अग्रलेखातून घेतला आहे. राहुल गांधींसारखा समंजसपणा ओवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हवा होता असं म्हटलं आहे. खरंतर देशावर आक्रमण करणाऱ्या बाबराच्या नावाने पाच एकर जमिनीची खैरात देण्याची दिलदारी फक्त हिंदुस्थानच दाखवू शकतो असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ओवेसींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असल्याचं म्हणताना सांगितलं होतं की, हा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय आहे. तसेच वादग्रस्त जागा रामलल्ला न्यासाला देऊन मुस्लिमांना पर्यायी जागा देऊ केली. आम्हाला खैरात नको. खरंतर आमची लढाई पर्यायी जागेसाठी कधीच नव्हती असंही ओवेसी म्हणाले होते.

वादग्रस्त जागेच्या निकालात महत्वाच्या ठरलेल्या पुरातत्व खात्याच्या अहवालाचेही महत्त्व अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. मंदिर पाडून त्याच्या जागी मशिदीची उभारणी केल्याचा पुरावा त्यांना देता आला नसला तरी मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती आणि त्याआधी गैर इस्लामिक बांधकाम असल्याचं न्यायालयानं मान्य केलं. तसेच वादग्रस्त जागेवर 1856 च्या आधी एक चौथरा होता ज्यावर हिंदू पूजा करायचे याकडे न्यायालयानं पुरावा म्हणून पाहिलं असंही शिवसेनेनं म्हटलं.

रामाच्या बाजूने देश उभा राहिला. आज देश जिंकला आणि अयोध्येत श्रीरामाचं आगमनं झालं. राम अयोध्येत पोहोचले तेव्हा दिवाळी साजरी झाली. आज रामास त्याचे जन्मस्थान पुन्हा मिळाले म्हणून देवदिवाळी साजरी करूया असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 11, 2019 08:01 AM IST

ताज्या बातम्या